Loksabha 2019 : सांगलीतून विशाल पाटील यांच्यासाठी लॉबिंग

Loksabha 2019 : सांगलीतून विशाल पाटील यांच्यासाठी लॉबिंग

सांगली - येथे लोकसभा मतदारसंघासाठी वसंतदादा घराण्यातून विशाल पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जात असल्याचे वरिष्ठ राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले काही दिवस नगर व सांगली मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा रंगली होती. विविध नवी नावेही चर्चेत येत होती. त्यावर आता पडदा पडल्याने सांगली काँग्रेसकडेच असेल याबाबतचा संभ्रम संपला आहे.

काँग्रेसकडून जी चार नावे चर्चेत आहेत त्यामध्ये आमदार विश्‍वजित कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाचा पक्षश्रेष्ठी विचार करत असल्याचे समजते.

विश्‍वजित कदम यांनीच लोकसभा लढावी, असा जाहीर आग्रह विशाल पाटील यांनी धरला होता. तर विश्‍वजित विशाल यांचे नाव पुढे करत होते. कदम गटाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस होऊ शकते हे ओळखून विशाल यांनी हा पवित्रा घेतला असावा असा तर्क मांडला जात आहे. जिल्हा काँग्रेस समितीकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस झालेली आहे. अर्थात प्रतीक यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दाखविली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दादा घराण्यालाच प्राधान्य द्यायचे असेल तर विशाल हेच दावेदार आहेत. मात्र राष्ट्रवादीची पसंती यापैकी कोणाच्या नावासाठी असेल याबाबत अजून दुजोरा मिळालेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मनातील तगडा उमेदवार ‘विश्‍वजित’च असतील असे आडाखे बांधले जात असताना आता विशाल यांचे नाव प्रदेश पातळीवरून दिल्लीकडे पुढे रेटले जात असल्याचे समजते. मात्र मित्रपक्षांना विचारात घेऊनच काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी येथील जागेचा निर्णय घेतील असे दिसते. 
दरम्यान, वसंतदादा कुटुंबातील सदस्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन जर विश्‍वजित लोकसभेसाठी तयार नसतील तर विशाल यांनाच द्या, असा आग्रह धरल्याचेही समजते. राष्ट्रवादीचे नेते जयंत  पाटील आणि आमदार विश्‍वजित कदम यांनी जर विशाल यांच्यासाठी सहमती दर्शवली तर विशाल यांचे नाव पुढे येऊ शकते, मात्र याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. 

अखेरपर्यंत खल
काँग्रेसपक्षश्रेष्ठींना दादा घराण्याला टाळूनही चालणार नाही आणि जिंकण्याची क्षमता कोणाची आहे, या गोष्टी पाहूनच निर्णय घ्यावा लागेल. पृथ्वीराज पाटीलदेखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या खास गोटातून प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर चाचपणी आणि खल अखेरपर्यंत सुरू राहील, असे सध्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com