Loksabha 2019 : माढ्यातून कोण? विजयसिंह मोहिते-पाटील, की...

Loksabha 2019 : माढ्यातून कोण? विजयसिंह मोहिते-पाटील, की...

पंढरपूर ः राष्ट्रवादीचे नेते माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याविषयी आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख की पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार यावर चर्चा झडू लागल्या आहेत. 

माढ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेमधील अंतर्गत कलह कमी करण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. भाजपपुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदेंनी देखील पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. शिंदेंसह सोलापूर जिल्हा परिषदेतील महाआघाडीतील शहाजी पाटील, उत्तम जानकर, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत यांनी पवारांना मदतीचे आश्‍वासन दिले होते. पवारांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येईल, असे वातावरण तयार झालेले असतानाच आज अचानक पवारांनी आपण माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पवारांनी माढ्यातून माघार घेतल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवारांचे विश्‍वासू माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांना संधी मिळेल अशी शक्‍यता निर्माण झाली असली तरी पवारांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या विजयसिंह मोहिते- पाटलांना पुन्हा उमेदवार दिली जाईल अशीही चर्चा आहे. देशमुख- मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असली तर पवार नवीन उमेदवार देतील, अशीही शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यात फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर व अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे आले आहे. उद्या (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीची यादी जाहीर होणार आहे. 

भाजप प्रणित महाआघाडी भक्कम 
शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्यास अनुकूलता दर्शवल्यानंतर भाजप प्रणित महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी भाजप सोडून पवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता. आमदार प्रशांत परिचारक यांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा सुुरू केली होती. स्वतः पवार निवडणुकीच्या रिंगणात असते तर भाजप प्रणित महाआघाडीला फुटीचे ग्रहण लागले असते. परंतु पवारांनी माघार घेतल्याने संजय शिंदे आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणखी भक्कम झाली, अशीच चर्चा सध्या माढा मतदार संघात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com