Loksabha 2019 : बारणेंच्या पदयात्रेत महायुतीचा जोश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पिंपरी : "देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो', "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', "अप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं', अशा घोषणा, ढोल-ताशांचा गजर, अशा जोशपूर्ण वातावरणात मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. 9) जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पिंपरी : "देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो', "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', "अप्पा बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं', अशा घोषणा, ढोल-ताशांचा गजर, अशा जोशपूर्ण वातावरणात मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. 9) जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

आकुर्डी येथील खंडोबाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये बैलगाडीचे सारथ्य करीत बारणे यांनी दुपारी दोन वाजता प्राधिकरण कार्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. बारणे यांच्या पदयात्रेला सकाळी साडेअकरा वाजता खंडोबामाळ चौकातून सुरवात झाली. या वेळी युतीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेमध्ये बारणे यांच्यासह खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच दोन ते अडीच हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महिलांचा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग दिसत होता. डोक्‍यावर भगव्या रंगाचा फेटा आणि खांद्यावर उपरणे अशा पेहरावात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमुळे या परिसरातील वातावरण पूर्णपणे भगवे होऊन गेले होते. आकुर्डी गावठाण भागात मिरवणूक येताच तिथे पुष्पवृष्टी करण्यात आली. 

दरम्यान, दुपारी बारानंतर उन्हाचा चटका वाढत गेला. मात्र, कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम होता. पदयात्रेमध्ये तीन खुल्या जीपगाड्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत महिला नगरसेविका होत्या. अन्य दोन गाड्यांमध्ये युतीचे पदाधिकारी होते. याखेरीज दोन बैलगाड्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देणारा विजयरथ यामध्ये होता. त्याच्या पाठीमागे युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या 40 ते 50 गाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. मावळ भागातील 22 ढोल-ताशा पथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती. दोनच दिवसांपूर्वी श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये मनोमीलन झाल्यामुळे या पदयात्रेत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांकडून हे शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले. 

काही काळासाठी वाहतूक विस्कळित 
खंडोबामाळ चौकातून पदयात्रेला सुरवात झाल्यानंतर काही काळासाठी या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. हा रस्ता अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पदयात्रा सुरू होण्याअगोदर बारणे यांनी मतदारांशी हस्तांदोलन करीत त्यांच्याशी संवाद साधला. 
 

Web Title: Alliance participated with Excitement in shrirang Barne rally