Loksabha 2019: पवारांच्या मुळावर घाव घालण्यासाठी मी बारामतीत : अमित शहा

मिलिंद संगई
Friday, 19 April 2019

- पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे
- म्हणून मी बारामतीत आलो
- कुल यांना विजयी करुन मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आज बारामतीत आवाहन

बारामती: लोकसभेची यंदाची लढाई महत्वाची आहे, पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे, त्या साठीच मी बारामतीत आलो आहे, कांचन कुल यांना विजयी करुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बारामतीत केले.

शरद पवार व राहुल गांधी यांना लक्ष्य करत अमित शहा यांनी आज बारामतीत जोरदार बॅटींग केली. ही लढाई म्हणजे नुरा कुस्ती नसून खरोखरीची लढाई आहे असा संदेशच आज शहा यांनी देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला.

चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, राम शिंदे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, कांचन कुल, वासुदेव काळे, दिलीप खैरे, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, प्रशांत सातव, रंजना कुल, नितिन भामे, सुरेंद्र जेवरे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. 

अमित शहांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
• बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण नाही, अशा अफवा होत्या म्हणूनच सभेचे नियोजन नसतानाही कार्यकर्त्यांना बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. 
•  घाव घालताना मुळावरच घालायचा म्हणूनच बारामतीची जागा जिंकण्यासाठीच ही लढाई आहे. 
• देशातील घराणेशाही संपविण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे. 
• नरेंद्र मोदी यांनी गरीबी पाहिली व अनुभवली आहे, त्या मुळे तेच खऱ्या अर्थाने गरीबी दूर करु शकतात, पाच पिढ्या व 55 वर्षे राजकारण करणाऱ्या गांधी परिवाराला गरीबी हटविणे जमणार नाही. 
• देशात 50 वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात दहा वर्षे मंत्री असलेल्या शरद पवार यांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला हे सांगावे, भाजप युवा मोर्चाचा युवक पवारांशी चौकात चर्चा करायला तयार आहे. 
• मनमोहनसिंगांच्या काळात शेतकऱ्यांना 1 लाख 15 हजार कोटींचे अर्थसहाय्य दिले गेले, मोदींनी हाच आकडा 4 लाख 38 हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवला. 
•   प्रगतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचा शरद पवारांनी विकास केला की त्याला खाली खेचले असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. 
• जे कुटुंबाचे भले करण्याच्या मागे आहेत ते देशाचे भले करु शकणार नाहीत म्हणून मोदींचे हात बळकट करा असे आवाहन शहांनी केेले. 
• पवार कृषीमंत्री असताना कच्ची साखर आयात करत होते, मोदींनी आयात थांबविली त्याचा उसउत्पादकांना फायदा झाला, इथेनॉलचे दरही वाढवून दिल्याने कारखानदारी बळकट झाली. 
• लोकसभेची निवडणूक संपली की पुरंदर विमानतळाचे काम प्राधान्याने मार्गी लावण्याची विजय शिवतारे यांना अमित शहा यांची ग्वाही दिली. 
• आम्ही न मागताही पाच वर्षांचा हिशेब दिला आहे, शरद पवार आपण काय केल याचा हिशेब द्यावा असेही शहा म्हणाले. 
• बारामतीकर आपण मतदार आहात, मतदार म्हणून आपण पवारांना विकासाचा हिशोब मागायला नको का असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. 
•  मनमोहनसिंगाचा उल्लेख मौनीबाबा करत मोदी सरकारने घुसखोरी थांबवून देश सुरक्षित केला, मनमोहनसिंगांनी घुसखोरी व हल्ले होताना उफ देखील निघाले नाही अशी टीका.
• दहशतवाद्यांबरोबर चर्चेचा आग्रह राहुल गांधी व शरद पवार करतात हे योग्य आहे का असा बारामतीकरांना अमित शहांचा सवाल. 
• गोळी आली तर गोळ्याने आम्ही उत्तर देऊ, ईट का जबाब पत्थर से देऊ, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. 
• देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे कॉंग्रेसने जाहीर केले आहे, आम्ही सत्तेवर येताच एक एक घुसखोर शोधून त्याला देशाबाहेर घालविण्याचे काम करु. 
• राहुल गांधी व शरद पवार या देशाचे संरक्षण करु शकतात का, असा बारामतीकरांना अमित शहांचा जाहीर सवाल. 
• गेल्या वेळेस महादेव जानकरांना कमळ चिन्ह न देण्याची चूक यंदा सुधारली आहे, कांचन कुल खासदार झाल्यास त्याचा हिशेब आपण पाच वर्षानी येऊन देऊ अशी ग्वाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah targets Sharad Pawar in his home town Baramati during Lok Sabha 2019