Loksabha 2019 : भाजप वॉर रूम अद्यापही थंडच

Loksabha 2019 : भाजप वॉर रूम अद्यापही थंडच

पुणे - सोशल मीडियावरून आक्रमकपणे प्रचारासाठी ‘वॉर’ रूमचे महत्त्व असले तरी, भाजपने अद्याप ती सुरूच केलेली नाही. शहर भाजपच्या अधिकृत फेसबुकवर निवडणुकीसंदर्भात त्यावरही अपडेट टाकले जात नाहीत. शनिवारी भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांचे जंगी स्वागत पक्ष कार्यालयात करूनही त्याचा साधा एक फोटोही या पेजवरून पोस्ट करण्यात आलेला नाही. 

यंदाची लोकसभा निवडणूक सोशल मीडियावर आहे, असे सांगत भाजपचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ‘चौकीदार चोर है’ला उत्तर म्हणून ‘मैं हूँ चौकीदार’ ही मोहीम भाजपने सुरू केली. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी, सोशल मीडियावरून टीका होत आहे. अशावेळी प्रत्युत्तर देण्यासाठी वॉर रूमची गरज भासते. 

भाजपकडून शहर कार्यालयामध्ये वॉर रूम तयार केली जाणार आहे. त्यात सोशल मीडियातून केला जाणारा प्रचार आणि प्रत्यक्षात रस्त्यावर करण्याचा प्रचार याची रणनीती आखली जाणार आहे. यामध्ये ४० ते ५० कार्यकर्ते कार्यरत असतील, असेही सांगण्यात येत आहे. सोशल मीडियासेलकडून केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेने केलेल्या कामांचा प्रचार केला जाणार आहे.त्यात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या प्रचारावर भर असणार आहे. भाजपचा आयटी सेल, सोशल मीडिया सेल आणि प्रचार प्रसिद्धी विभाग या तिघांच्या समन्वयातून वॉर रूमचे काम चालणार आहे. भाजपकडून वॉर रूममधून काम कसे चालणार, हे सांगितले जात असले तरी अद्याप ती सुरू झालेली नाही. पुढील काही दिवसात नियोजन करून वॉर रूम सुरू होईल, असे भाजपच्या पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, या उलट काँग्रेस भवनात वॉर रूम सुरू करून काँग्रेसने भाजप विरोधात प्रचार सुरू केला आहे.

पक्ष आणि शहराध्यक्षांचे फेसबुक पेज एकच 
शहर भाजपने फेसबुक पेज सुरू केले असून, त्यास ५० हजारांपेक्षा जास्त लाइक आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचेही फेसबुक पेज असून, त्यास केवळ १२८८ लाईक आहेत. मात्र आता योगेश गोगावले यांनी शहर भाजपच्या पेजचा वापर सुरू केला आहे. ‘चौकीदार बीजेपी पुणे सिटी-योगेश गोगावले’ असे या पेजचे नाव करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com