Loksabha 2019 : अब की बार...लांबूनच नमस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे - ‘पाच वर्षांपूर्वी विकासावर बोलणारे आता व्यक्तिगत आणि कुटुंबावर बोलू लागले आहेत. केवळ आश्‍वासने दिली, केले काहीच नाही. पुन्हा ते तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फसू नका. ते ‘अब की बार...’ म्हणाले तर तुम्ही ‘लांबूनच नमस्कार’ म्हणा,’ अशा शब्दांत भाजपच्या घोषणेची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी टिंगल केली. निवडणूक अस्तित्वाची आहे, गाफील राहू नका, असा सल्लाही नेत्यांनी दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी झालेल्या सभेत आघाडीच्या नेत्यांनी हे आवाहन केले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, सोनम पटेल, उल्हास पवार, कुमार सप्तर्षी, विश्‍वजित कदम, रमेश बागवे, संजय जगताप, चेतन तुपे, प्रदीप गारटकर, प्रवीण गायकवाड, पार्थ पवार यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ‘‘जे पक्ष सोडून गेले, ते कशासाठी गेले हे मला माहीत आहे. त्यांची अंडीपिल्ली माझ्याकडे आहेत. सत्तेत आम्ही ५०  वर्षं होतो. पण सत्तेचा असा गैरवापर केला नाही. तुला हे देतो, आमच्याकडे ये. नाही येत तर तुरुंगात टाकतो, अशी भाषा केली जात आहे. किती दिवस हा बागूल बुवा करणार आहात.’’

ते म्हणाले,‘‘ जनतेच्या प्रश्‍नावर बोलण्याऐवजी मोदी पवार कुटुंबीयांवर बोलतात. शिवसेनेचे तर अजिबात ऐकू नका. त्यांची सटकली आहे. २५ वर्षं सेना सडली. पाच वर्षं टीका करणारे आता कुठे गेले. त्यांच्या पक्षाला कोणतीही व्हिजन नाही.’’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘भाजप आणि मोदी ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित करून पाहत आहे. ती खेचून पुन्हा जाहीरनामा आणि विकासाच्या मुद्यांवर आणली पाहिजे. पाच वर्षांच्या कारभाराबाबत त्यांना प्रश्‍न विचारले पाहिजेत. लोकशाहीत विरोधकांना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही विचारले तर आम्हाला ते देशद्रोही ठरवून आवाज बंद करण्याचा प्रत्यन करू पाहत आहेत.’’

हर्षवर्धन पाटील, ‘‘या निवडणुकीवर तुमचे आणि आमचे भवितव्य अवलंबून आहे. मतभेद विसरा, एकत्र या, ही काळाची गरज आहे. पुण्याची उमेदवारी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळाली आहे. पुण्यातील लढाई ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे.’

हे फेकू सरकार - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘केंद्रातले सरकार हे फेकू सरकार आहे. गुगलवर गेला आणि फेकू हा शब्द टाकला तरी तुम्हा याची माहिती मिळेल. ही कुटुंबांची निवडणूक नाही, देशाची आहे. मराठी शाळा बंद करून डान्स बार सुरू करणारे हे सरकार आहे. नीरव मोदी पळून जाताना चौकीदार काय झोपला होता का?’’

मी सच्चा पुणेकर - मोहन जोशी
‘मी सच्चा पुणेकर आहे,’ असे सांगून मोहन जोशी म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत पालकमंत्र्यांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे त्यांना आता घरी घालविण्याची वेळ आली आहे. तुम्ही मला संधी द्या. गेल्या पाच वर्षांत जी कामे झाली नाहीत. ती कामे मी पुढील पाच वर्षांत दुपटीने करून दाखवितो. पुण्याचा विकास हाच माझ्या ध्यास आहे.’’

पुण्यातील उमेदवारी का बदलली?
केंद्रात आणि राज्यात पक्षाची कामगिरी चांगली आहे, तर पुण्यातील उमेदवारी का बदलली, असा सवाल उपस्थित करून अजित पवार म्हणाले, ‘याचे उत्तर पुणेकरांना मिळाले पाहिजे. पुण्याचा खासदार विकासकामे करण्यात नापास झाला, हे भाजपने घेतलेल्या परीक्षेत कळले म्हणून त्यांचे तिकीट कापले.’’

Web Title: The candidate of the Baramati Lok Sabha constituency Supriya Sule and candidate from Pune Lok Sabha constituency Mohan Joshi filed the nomination papers today