Loksabha 2019 : प्रचारात जोशी-बापटांचे "चिरंजीव'च बॅकस्टेज आर्टिस्ट

Loksabha 2019 : प्रचारात जोशी-बापटांचे "चिरंजीव'च बॅकस्टेज आर्टिस्ट

पुणे: लोकसभेसाठी शहरातून भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी निवडणूक रिंगणात असले, तरी त्यांच्या प्रचाराची धुरा "बॅकस्टेज आर्टिस्ट'च्या धर्तीवर त्यांच्या चिरंजिवांनीच उचलली आहे. दोन्हीच्या पक्षसंघटना प्रबळ असल्या, तरी समन्वयाची भूमिका हेच पार पडत आहेत. रात्री अवघ्या तीन-चार तासांची विश्रांती घेऊन दोन्ही चिरंजीव आपल्या बाबांसाठी सध्या अहोरात्र झटत आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बापट यांची उमेदवारी 23, तर जोशी यांची उमेदवारी 31 मार्च रोजी जाहीर झाली. तुलनेने दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले आणि सहा विधानसभा मतदारसंघातील 21 लाख मतदारांसमोर पोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पक्षीय राजकारण आणि पक्षांतर्गत आव्हाने पार करीत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी बापट यांचे चिरंजीव गौरव, तर जोशी यांचे चिरंजीव रोहित आता मैदानात उतरले आहेत. प्रचाराची भिस्त दोन्ही पक्षसंघटनांवर असली, तरी केंद्रबिंदू मात्र, गौरव आणि रोहितभोवतीच असल्याचे दिसून येते. 

विधी शाखेचा पदवीधर असलेल्या गौरव कायदेशीर सल्लागार आहे. प्रचार मोहिमेच्या नियोजनात त्याचा सहभाग असतोच. बापट यांच्या ड्रेसचा रंग कोणता असावा, या पासून ते सोशल मिडीयावर कोणत्या पोस्ट पडल्या पाहिजेत, यावरही त्याचे लक्ष आहे. तसेच सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा, त्यात सहभागी कोण आहेत, घटक पक्षांचा समन्वय याकडेही त्याला लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे सकाळी सात वाजता सुरू झालेला दिवस पहाटे दोन-तीन वाजता संपतो. गौरवबरोबरच राजकीय पार्श्‍वभूमी असलेली त्याची पत्नी स्वरदा आणि आई गिरीजा याही प्रचारात सहभागी आहेत. कोणी कोठे प्रचार करायचा, याचेही नियोजन घरातून बाहेर पडताना करतो, असेही गौरवने सांगितले. 

रोहितचे शिक्षण "एमबीए'पर्यंत झालेले. सध्या बांधकाम व्यवसायात तो स्थिरावला आहे. जोशी यांची उमेदवारी घोषित झाली अन्‌ त्या क्षणापासून रोहितचेही काम सुरू झाले. विविध समाजघटकांपर्यंत पोचण्याचे नियोजन करतानाच सोशल मिडियाची स्ट्रेटेजीही तो ठरवत आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रभागनिहाय प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेतानाच शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशीही संपर्कही रोहित ठेवत आहे. आई निर्मला, बहिण रुतिका आणि पत्नी गायत्री या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. 

गेल्या 40 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत. अहोरात्र ते कार्यकर्त्यांमध्येच असतात. त्यामुळे राजकारण-समाजकारणाचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. त्याचा उपयोग यंदाही प्रचाराचे नियोजन करताना मला होत आहे. 
-गौरव बापट 


दादांचे नाव आणि त्यांचा स्वभाव, याची मतदारांना माहिती आहे. त्यामुळे प्रचारात आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोशल मिडियाहीवरही नेटिझन्स आमच्या बरोबर आहेत. विविध समाजघटकांशी दादांचा सातत्याने संपर्क आहे. 
-रोहित जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com