Loksabha 2019 : मला आता पाहायचंय तरुण नेतृत्वांना - शरद पवार

Loksabha 2019 :  मला आता पाहायचंय तरुण नेतृत्वांना - शरद पवार

तळेगाव दाभाडे -  ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत. आगामी काळात राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविताना या पिढीतील नेतृत्वांना आता ‘याचि देही, याचि डोळा’ पाहायचे आहे,’’ असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी मोदी देशभर फिरले. शेतीचा विकास, उद्योगात वाढ, बेरोजगारांना काम, जातीधर्मात ऐक्‍य निर्माण करण्याच्या केवळ गप्पा मारल्या. लोकांनी बहुमत देऊन संधी दिली. सत्तेवर येताच नोटाबंदीसारखा चुकीचा निर्णय करून देशवासीयांना रांगेत उभे केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. उद्योगाला चालना नसल्याने बेरोजगारी वाढली. त्यांनी देशात सत्ता नेमकी कोणासाठी वापरली, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी त्यांना करता आली नाही. आता पुन्हा सत्तेसाठी संधी मागत आहेत. त्याला मतदार भुलणार नाहीत.’’ 

पवार म्हणाले, ‘‘देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या देशाचे तुकडे करण्याची क्षमता असल्याचे इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा करून कृतीतून दाखविले होते. मोदींच्या परदेश दौऱ्यांनी काय साध्य झाले. काँग्रेसच्या धोरणांमुळेच उद्योग आले. शेती समृद्ध झाली. शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटींचे कर्ज माफ केले. आता ही ध्येयधोरणे राबविण्यासाठी महाआघाडीने तरुणांना संधी दिली आहे. ही क्षमता केवळ महाआघाडीतच असल्याने उमेदवारांना विजयी करा.’’ 

या वेळी विदुरा नवले, जयदेव गायकवाड, रामराव वरकुटे, रमेश साळवे, चंद्रकांत सातकर, किरण गायकवाड, विजय कोलते आदींची भाषणे झाली. सभेला कृष्णराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, जालिंदर कामठे, बाळासाहेब नेवाळे, माऊली दाभाडे, यादवेंद्र खळदे, सीमा आनंदे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, उपस्थित होते. प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार कोतुळकर यांनी केले. सचिन घोटकुले यांनी आभार मानले.

माझ्या राजकीय जीवनात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पाहिल्या. मात्र, नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील सभा मात्र निराळीच वाटली. सभेला आलेल्या नागरिकांना सभेतून जाता येऊ नये म्हणून सभेच्या ठिकाणी मधोमध खंदक खोदण्यात आले  होते.
- शरद पवार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com