Loksabha 2019 : आप महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : आम आदमी पार्टी राज्य कार्यकारिणी व राष्ट्रीय राजकीय निर्णय समिती च्या विस्तृत विचार विनिमयाअंती महाराष्ट्रात लोकसभा २०१९ निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.​

पुणे : आम आदमी पार्टी राज्य कार्यकारिणी व राष्ट्रीय राजकीय निर्णय समितीच्या विस्तृत विचार विनिमयाअंती महाराष्ट्रात लोकसभा २०१९ निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती आम आदमी पार्टी प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी सरकारविरुद्ध आम आदमी पार्टीने देशभर निवडणूक लढवली. दरम्यान आम आदमी पार्टी मोठ्या बहुमताने दिल्ली विधानसभेत निवडूण आली. दिल्लीकर जनतेने केंद्रात भाजप पण दिल्लीत केजरीवाल ही भूमिका घेतल्याचे निवडणूक निकालावरून दिसूल आले. परंतु पुढील चार वर्षात केंद्रातील भाजप सरकारने अत्यंत द्वेषपूर्ण आणि सूड भावनेने, तपास यंत्रणा ताब्यात घेत विविध खोटे आरोप लावत, तर कधी नायब राज्यपालांच्या मार्फत आडकाठी करत आप सरकारला काम करू न देण्याचा चंगच बांधला. या सगळ्या केसेस ही कोर्टात खोट्या ठरल्या आणि या त्रासाला पुरून उरत दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले जाईल असे काम शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केले. आज त्याचे अनुकरण महाराष्ट्रात नाशिक, मुंबई , पुणे महानगरपालिका करू पाहते आहे. या सर्व प्रवासात केंद्रातील मोदी सरकारची वाटचाल ही लोकशाही मोडीत काढण्यासाठी चालू आहे असेच दिसून आले अशी माहिती  त्यांनी दिली. 

या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला हटवण्याच्या बरोबर रोजगार, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न राजकीय पटलावर यावेत यासाठी जनजागृतीचे काम आम आदमी पार्टी करेल. भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई आणि दिल्लीतील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कामाचे ‘आप मॉडेल’ लोकांसमोर घेऊन जात आम आदमी पार्टी येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवेल असेही त्यांनी सांगितले आहे. 

Web Title: Loksabha 2019 : AAP will not the Lok Sabha election in Maharashtra