Loksabha 2019 : शिरोळेंची उमेदवारी का नाकारली? 

bapat shirole
bapat shirole

कामात चोख, वक्तशीरपणा, पक्षाची शिस्त पाळणारा लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षात प्रतिमा तयार करून ही खासदार अनिल शिरोळे यांनी उमेदवारी भाजप नेतुत्वाने कापली. गिरीश बापट यांना संधी दिली. पण शिरोळेंना उमेदवारी का नाकारली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अनिल शिरोळे म्हणजे पुण्याच्या राजकारणातील शांत, सभ्य, स्वच्छ प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ओळख. लोकसभेसाठी पुण्यातून उमेदवारी कोणाला द्यायची यावरून शिरोळे, बापट आणि खासदार संजय काकडे यांचे नाव पुर्वीपासून चर्चेत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांची नावे समोर आली. यात विशेषतः शिरोळे, काकडे आणि बापट यांच्यात रस्सीखेच सुरू होती.

शिरोळेंनी गेल्या पाच वर्षात केंद्राकडून पुण्यातील लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, पुरंदर येथे नवीन विमानतळ, लष्कराच्या जागेत अडकलेले प्रकल्प,  स्मार्ट सिटी असे अनेक कामे मार्गी लावली. पक्ष नेतृत्वपुढे चांगली प्रतिमा यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमध्ये शिरोळे कधी पडले नाहीत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पुर्वीपासून पुण्याचे नेतृत्व कोण करणार यावरून बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते, पण या भानगडीत न पडता शिरोळे यांनी "आपण भले आणि आपले काम भले" याच पद्धतीने कार्यरत राहिले. शिरोळेंचा जनसंपर्क कमी आहे.  कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत म्हणून पक्षातील एक गट त्यांच्यावर कायम टीका करत होता, तरीही शिरोळे यांच्या कार्यपद्धती बदल झाला नाही. त्याउलट दांडगा जनसंपर्क, प्रत्येक पक्षामध्ये असलेली मैत्री, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि आक्रमकपणे काम करण्याची पद्धत यामुळे गिरीश बापट आणि काकडे हे त्यांना तगडे स्पर्धक होते. गुजरात विधानसभा निवडणुकीपासून काकडे यांनी केलेल्या वक्तव्यांपासून ते काही दिवसांपूर्वी मी काँग्रेसमध्ये जात आहे अशी केलेल्या घोषणा यामुळे त्यांचा पत्ता आपोआप कट झाला.

शिरोळे आणि बापट यांच्यातील स्पर्धा कायम होतीच.  २०१४च्या निवडणुकीत शिरोळे यांना ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा गिरीश बापट प्रचंड नाराज झाले होते. त्यांना प्रचारात आणण्यासाठी अनेकांना समजूत काढावी लागली होती. केंद्रात वजन असलेल्या नेत्यांनी पुढच्या वेळी तुम्हाला संधी देऊ असे आश्वासन देऊन बापट यांची समजूत काढली होती. या आश्वासनाला कायम लक्षात ठेऊन बापट यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवलेच होते.

विद्यमान खासदार शिरोळें यांनी चोख कामगिरी बजावूनही त्यांच्या ऐवजी बापटांना उमेदवारी जाहीर केली तर, काय होऊ शकते याचा अंदाज पक्षाने घेतला. यात शिरोळे बंडखोरी करतील, पक्षात गोंधळ होईल अशी कोणतीही शक्यता नव्हती. शिरोळे यांनी राजकारण करताना ना कुरघोडी, ना गटबाजी केली. त्यांचे स्वतःचे उपद्रवमूल्य कधीच दाखवले नाही. केंद्र सरकार आक्रमकपणे कामांचे मार्केटिंग करत असताना शिरोळे मात्र यात कमी पडले असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.  

शिरोळेंचा शांतपणा, उपद्रवमूल्य नसने, केलेल्या कामांचे योग्य पद्धतीने सादरीकरण करण्यात पडलेली कमतरता याच गोष्टी बापट यांच्या पथ्यावर पडल्याने शिरोळे यांचा पत्ता कट झाला.  उमेदवारी नाकारल्यावर शिरोळे नाराज होणार नाहीत हे निश्चितच होते. भाजपचे उमेदवार असलेले गिरीश बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरोळे सपत्नीक घरी जाणार असे त्यांनी सांगितले, यावरूनच शिरोळेंचा खिलाडू वृत्तीचा प्रत्यय आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com