Loksabha 2019 : बापट, जोशी यांचे जाहीरनामे गुलदस्तातच !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

गेल्या निवडणुकीतही विलंब
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीसाठी तेव्हा १७ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्या वेळीही भाजप- काँग्रेसचे जाहीरनामे उशिराच प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी काँग्रेसचा १३, तर भाजपचा १४ एप्रिल रोजी शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. मतदानाच्या  तीन -चार दिवसच अगोदर हे जाहीरनामे उमेदवारांनी मतदारांसमोर मांडले होते.

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान ११ दिवसांवर आले, तरी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे शहराच्या विकासाबद्दलची भूमिका स्पष्ट करणारे जाहिरनामे तयार झालेले नाहीत. त्यामुळे विकासकामांबद्दलची या पक्षांची भूमिका तूर्त गुलदस्तातच आहे. 

निवडून आल्यावर देशाच्या विकासाबद्दलची भूमिका कशी असेल, शेतकरी- उद्योजक, नोकरदार, महिला, युवक आदींसाठी कोणत्या योजना राबविणार, त्या बाबतचे धोरण काय असेल, या बाबत भाजप आणि काँग्रेसचे जाहीरनामे राष्ट्रीयस्तरावर नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. मात्र पुण्याबाबत विकास योजना कोणत्या राबविणार, याचे जाहीरनामे तयार झालेले नाहीत. पुण्यात वाहतूक हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी मेट्रो, पीएमपी, बीआरटी, रिंगरोड, एचसीएमटीआर आदींबाबत दोन्ही पक्ष काय करणार? तसेच पर्यावरण- प्रदूषण, मुळा-मुठा नदी संवर्धन, परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) याबाबत पुण्याच्या विकासाची दिशा काय असेल, या बद्दल मतदारांना औत्सुक्‍य आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात २३ एप्रिलला मतदान आहे. सुमारे २१ लाख मतदार शहरात आहेत. उमेदवाराचे जाहीरनामे प्रसिद्ध झाल्यावर भाजप, काँग्रेस ते मतदारांपर्यंत पोचविणार कसे, हा प्रश्‍नच आहे. सुमारे पाच ते सहा लाख कुटुंबांपर्यंत हे जाहीरनामे पोचणार का, या बद्दलही औत्सुक्‍य आहे.

शहर विकासाची भूमिका मांडणारा पक्षाचा जाहीरनामा तयार झाला आहे. चार दिवसांत तो प्रसिद्ध करून मतदारांसमोर तो मांडला जाईल. हा जाहीरनामा मतदारांसमोर पोचविण्यासाठी पक्षाची यंत्रणा सज्ज आहे. 
- माधुरी मिसाळ, जाहीरनामा समिती प्रमुख, भाजप

शहर विकासाबद्दलची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका जाहीरनाम्याद्वारे मतदारांसमोर मांडण्यात येईल. त्यासाठीचा आराखडा तयार आहे. चार-पाच दिवसांत तो प्रसिद्ध करून कार्यकर्ते मतदारांपर्यंत तो पोचवतील. त्या दृष्टीने नियोजन झाले आहे. 
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Loksabha Election 2019 Girish Bapat Mohan Joshi Declaration Politics