Loksabha 2019 : विनाकारण कार्यालयात गर्दी नको - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

भाजपच्या नगरसेवक, संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विनाकारण पक्ष कार्यालयात येऊन गर्दी करू नये. आपापल्या भागातच राहून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोचवा, असे आदेश महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.

पुणे - भाजपच्या नगरसेवक, संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विनाकारण पक्ष कार्यालयात येऊन गर्दी करू नये. आपापल्या भागातच राहून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोचवा, असे आदेश महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. 

जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या शहर कार्यालयात निवडणुकीची लगबग सुरू आहे. प्रचाराचे नियोजन, मतदार स्लिपांची तयारी यासह बैठका सुरू आहेत. पण ज्यांना बैठकांना बोलावले आहे त्यांनीच पक्ष कार्यालयात यावे, विनाकारण येऊन कार्यालयात गर्दी करू नका, असे आदेश नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांशी समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे. तेथून कार्यकर्ते, पदाधिकारी यांना नियोजनाच्या सूचना दिल्या जात आहेत. लाखो मतदारांशी संपर्क साधण्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. याची जबाबदारी नगरसेवकांवर आहे. कोणता नगरसेवक काय करतो आहे, यावर सीसीटीव्हीप्रमाणे पक्षाची नजर आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रचार करा, असे आदेश नगरसेवकांना दिले आहेत. ज्या भागात भाजपचे नगरसेवक नाहीत, तेथे पराभूत झालेले पक्षाचे उमेदवारांशी संपर्क साधला आहे, नगरसेविकांच्या पतींनाही भाजपने प्रचारात ओढले आहे. मात्र, ही प्रचार यंत्रणा राबविताना प्रभाग सोडू नका, विनाकारण पक्ष कार्यालयात येऊ नका, अशी तंबीच दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Girish Bapat Politics