Loksabha 2019 : लढण्याऐवजी वेळ ओढविली प्रचाराची

Shirur-and-Maval
Shirur-and-Maval

पिंपरी - खासदार होण्याची इच्छा होती. सर्व पातळीवर तयारी केली होती. कार्यकर्त्यांना महापालिकेत चांगली पदे दिली, वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम घेऊन ब्रॅंडिंग केले. अमाप खर्चही केला, मात्र परिस्थितीच अशी ओढविली की युती झाल्याने निराश होऊन घरी बसावे लागले. त्यातूनही काही हालचाली कराव्या म्हटल्या तर पक्षाचा आदेश आला प्रचारात सहभागी व्हा. त्यामुळे इतकी वर्षे ज्यांच्यावर आरोपांचे तोफगोळे फेकले, त्यांच्यासाठी आता स्तुतिसुमने उधळावी लागणार आहेत. कारण, लवकरच होणाऱ्या प्रचारसभा, बैठका, मेळाव्यांना जावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या मनाची व्यथा आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने तक्रारीला वावच राहिलेला नाही.

मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे व शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी आपापले विरोधक जगताप व लांडगे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चा वेगळ्या दिशेने सुरू झाल्या आहेत. जगताप-बारणे यांच्या भेटीचा तपशील बाहेर येऊ दिलेला नाही. तसेच, पुरावा म्हणून एखादे छायाचित्रही व्हायरल केलेले नाही. सगळे काही गोपनीय राखले आहे.

यातूनच अनेक अंदाज बांधले जात आहेत. याच्या नेमके उलट आढळराव-लांडगे भेटीचे आहे. भेट कोठे झाली, कोण-कोण कार्यकर्ते उपस्थित होते, काय चर्चा झाली, काय अटी समोर ठेवल्या, कोणती आश्‍वासने घेतली याची इत्थंभूत माहिती पत्रक व छायाचित्रासह माध्यमांना दिली आहे.

छायाचित्रामध्ये सगळ्यांचेच चेहरे गंभीर आहेत. याचेही अर्थ लावले जात आहेत. दोन्ही बैठकांनंतर पुन्हा वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू झाली असली तरी यातील एक मुद्दा म्हणजे कोण कोणावर भारी पडले अधिक चर्चेचा ठरला आहे.

जगताप-बारणे यांची ओळख कट्टर विरोधक अशी असली तरी २००८ पर्यंत चांगले मित्र म्हणून प्रसिद्ध होते. ही जोडी फुटण्यास २००९ची विधानसभा निवडणूक निमित्त ठरली. हा इतिहास असला तरी एकमेकांविषयी राजकीय असूया निर्माण झाली. दोघांनी राजकीय पक्ष बदलले. एकमेकाला मात देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची थेट विभागणी झाली. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. याची पातळी अगदी खालच्या पातळीवर गेली. यामुळेच २०१९ साठी हीच जोडी रिंगणात असेल, असे चित्र होते. त्यादृष्टीने दोघांचीही तयारी सुरू होती. कोण वरचढ ठरेल याविषयी भाकितेही वर्तविली जाती. मात्र, होत्याचे नव्हते झाले. जगताप यांना रिंगणाबाहेर व्हावे लागले. हे त्यांच्यासाठी आणि पक्षीय, कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुद्धा निराशादायी ठरले. युती असल्यामुळे आता काही बोलताही येत नाही. तसेच नाराजीही लपविता येत नाही. त्यातूनच पक्षादेश असल्याने प्रचारातही सहभागी व्हावे लागणार आहे. आता आजवर झालेल्या आणि केलेल्या आरोपांचे करायचे काय? अतिक्रमण, फेरीवाले, गुंडगिरी हे प्रश्‍न आणि पक्षबदलू, चमको, फोटोवाला, अशिक्षित अशा उपमा विसराव्या लागणार आहेत.

भोसरीत लांडगे-आढळराव भेटीने शिरूर मतदारसंघातील सर्व प्रश्‍न हवेत विरून गेले आहेत. नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी, बैलगाडा सगळे सुरू झाले आहे. लांडगे यांना आमदार झाल्याबरोबर खासदार होण्याची आस लागली होती. वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवरील भावी खासदार असा ठळक उल्लेख स्वत:लाच सुखावणारा वाटत होता. कार्यकर्त्यांचे मोहोळ दिवसागणिक वाढत होते. सलग दोन वेळा आपल्याच मतदारसंघातील महापौर केला होता. परंतु, युतीत सगळे बिघडले. उपद्रवमूल्य दाखवावे म्हटले तर संघ शिस्तपालनाची जबाबदारी आडवी आली. त्यामुळे नाइलाजाने प्रचाराला जावे लागेल. मग कराव्या लागणाऱ्या भाषणात शब्दांच्या कसरतीची सवय करावी लागणार आहे.

आदेशाची प्रतीक्षा
लक्ष्मण जगताप यांनी प्रचारातील आपली भूमिका नेमकी काय याचा उलगडा अद्याप केलेला नाही. तर महेश लांडगे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्याकडून खूप काही वदवून घेतले आहे म्हणे. मात्र, भेटीवेळी त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा लपत नव्हती. मतदानासाठी २९ दिवसांचा अवधी आहे. देशात किंवा राज्यात पहिल्या एक-दोन टप्प्यात काही ठिकाणी होणाऱ्या मतदानावेळेपर्यंतच अनेक उलथापालथी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याचमुळे हा भेटीचा कार्यक्रम झाला असून प्रचारात तोंडदेखले हजर राहायचे की सहकार्य करायचे नाही, असे आदेश वरून आल्यावर शिरूर व मावळमध्ये या दोघांकडून हालचाली होतील, असे खात्रीलायक समजते. तरीही एवढे मात्र नक्की दोघांनाही २०१९चे खासदार बनायच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com