Loksabha 2019 : मनसेची सभा, नको रे बाबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मनसेने लावली ‘फिल्डिंग’
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा क्षेत्रात मनसेने प्रचाराची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेत त्यांचा एकमेव नगरसेवक आहे. मात्र, त्या अगोदरच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्यातील राहुल जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ते महापौर आहेत. मात्र, मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात सक्रीय झाले आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. पदयात्रा काढल्या जात आहेत.

राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात
पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार व नेत्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांच्यासह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीला सभेचा फायदा होत असल्याने आघाडीने सभा घेण्यासाठी जोर लावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करेल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने पावले टाकली आहेत. त्याचा फायदा मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना करून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात झालेल्या जाहीर सभांद्वारे राज ठाकरे यांनी मोदी-शहा जोडीवर शरसंधान साधले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथे गुरुवार (ता. २५) राज यांची सभा होणार आहे. त्याद्वारे पनवेल, उरण व कर्जत विधानसभा क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पाडण्याची व्यूहरचना मनसे व महाआघाडीने आखली आहे. त्यासाठीच मनसेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे शहरात आले होते.

राज यांच्या सभेबाबत त्यांनीच पत्रकारांना माहिती दिली. त्यांच्या समवेत मनसेचे नेते गणेश सातपुते, रणजित शिरोळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले होते. यावरून पिंपरी-चिंचवडवर राज यांचे लक्ष असल्याचे दिसून येते. मात्र, ‘कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जायचे नाही,’ अशी त्यांची भूमिका अनेकांच्या मनात संदिग्धता निर्माण करणारी आहे. कारण, विकासाऐवजी देशात सुरू असणारी एकाधिकारशाही, मोदी आणि शहा यांच्याच विरोधात ते स्वतंत्रपणे प्रचार करीत आहे. ‘प्रचारासाठी आम्हाला कुणाकडूनही निधीची आवश्‍यकता नाही, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत,’ असे शिंदे यांनी जाहीर केले होते. हे कशाचे द्योतक आहे, इतके कळण्याइतकेही नागरिक सुज्ञ नाहीत, अशा अविर्भावात मनसेने राहू नये, म्हणजे त्यांची योजना यशस्वी झालीच म्हणून समजा.

श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते प्रभाग पातळीवर प्रचार करीत आहेत. तसेच, मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे रविवारी (ता. २१) आयोजन केले आहे. त्याचा मतपेटीवर किती परिणाम झाला, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 MNS Speech Politics BJP Narendra Modi