Loksabha 2019 : काँग्रेसचा उमेदवार पुण्यासाठी अजून ठरेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मार्च 2019

‘मोदी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसला पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही निश्‍चित करता आलेला नाही. आयात की पक्षातील उमेदवार, याचा तिढा सुटत नसल्यामुळे उमेदवार निश्‍चित होत नसल्याचे बोलले जात आहे.

पुणे - ‘मोदी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसला पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही निश्‍चित करता आलेला नाही. आयात की पक्षातील उमेदवार, याचा तिढा सुटत नसल्यामुळे उमेदवार निश्‍चित होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यातून दररोज नवीन नावे पुढे येत असल्याने शहर काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे यांच्यासह अभय छाजेड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड हे इच्छुक आहेत. प्रदेश काँग्रेस समितीकडून पक्षश्रेष्ठींना शिफारस करण्यात आलेल्या नावांमध्ये शिंदे आणि जोशी यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांची नावे मागे पडली असल्याचे बोलले जात होते. या दोघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असे चित्र असताना अचानक गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले.

त्यामुळे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह शिंदे आणि जोशी यांनी दिल्ली गाठली. तेथे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन ‘आमच्यापैकी कोणालाही द्या; परंतु आयात उमेदवार नको,’ अशी गळ घातली.

त्यामुळे काल रात्री उमेदवारी जाहीर होईल, असे अपेक्षित होते. परंतु आज अचानक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले. ‘सकाळ’ने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Pune Congress Candidate Politics