Loksabha 2019 : चौदा दिवस आणि वीस लाख मतदार

voting
voting

आखिर इस काँग्रेस को हुआ क्‍या है? हा प्रश्‍न पुणेकरांच्या मनात पडणे सहाजिक होते. याचे मुख्य कारण प्रचारासाठीचा कमी कालावधी हे निश्‍चितच होतं. पुण्यातील यावेळची लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ असली तरी चौदा दिवसांमध्ये वीस लाख मतदारांपर्यंत अधिक सक्षमपणे पोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असणाऱ्या नवमतदाराला आपलेसे करण्याची किमयाही याच कालावधीत करावी लागणार आहे. 

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बहुतेक उमेदवारांनी दोन किंवा तीन एप्रिलचे मुहूर्त त्यासाठी काढले आहेत. अशावेळी पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. तसे पुण्यात भाजपशी टक्कर देणे कोणत्याही पक्षाला सोपे नाही, अशा वेळी खास करून काँग्रेसने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करून त्याला प्रचारासाठी अधिकाधिक वेळ द्यावा असे अपेक्षित होते. पण राज्यातील सर्वात शेवटच्या जागेचा निर्णय म्हणून पुण्याचा विचार झाला. आता दोन्ही पक्ष लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

त्यांना सर्वात जास्त कसरत करावी लागणार आहे, ती मतदारांपर्यंत पोचण्याची. पुण्यातील आतापर्यंतच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी फारशी चांगली नाही. गेल्या निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. त्याआधी २००९ मध्ये हे प्रमाण केवळ ४९ टक्के होते. यावर्षी किमान ६० टक्‍क्‍यांपर्यंत मतदान व्हावे अशी अपेक्षा आहे. यंदा पुणे लोकसभा मतदारसंघात २०.२४ लाख मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत प्रत्येक उमेदवाराला प्रत्यक्ष पोचणे अवघड आहे. त्यामुळे या वेळी ‘सोशल मीडिया’चा रोल महत्त्वाचा ठरणार आहे.

एका बाजूला प्रचारासाठी उरलेला कमी कालावधी आणि दुसरीकडे घटक पक्षांची मनधरणी ही कसरत सर्वच उमेदवारांना करावी लागणार आहे. एक तर काँग्रेस आघाडी असो किंवा भाजप-शिवसेना युती हे पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांपासून खूप दुरावलेले होते. त्यामुळे पटकन मिसळून प्रचार करण्यास कोणीही तयार नाही. बारामती मतदारसंघात इंदापूर, भोर असो वा पुरंदर याठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेसची समजूत काढण्यात दमछाक झाली आहे. हीच परिस्थिती मावळमध्ये भाजप-शिवसेनेच्या बाबतीत आहे. पुण्यात गिरीश बापट यांनी सुरवातीपासूनच शिवसेनेशी जुळवून घेतल्यामुळे ‘हेडमास्तरांना’ ते फारसे जड जाणार नाही. पण बारामती आणि मावळमध्ये काँग्रेस कसे काम करत आहे, यावरच राष्ट्रवादीचा पुण्यातील प्रतिसाद अवलंबून राहणार आहे. सध्यातरी पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीत आणि भाजप-शिवसेनेत सर्व अलबेल सुरू आहे, असे वरकरणी चित्र आहे. पण लोकसभेचा प्रचार करताना ‘भाऊ माझं विधानसभेचं नक्की ना?’ हा प्रश्‍न आवर्जून विचारला जात आहे. त्यामुळे प्रचाराचा पहिला टप्पा हा नाराजांची नाराजी दूर करणे आणि घटक पक्षांची मोट बांधणे असाच राहणार आहे. 

मतदारसंघाचा विस्तार पाहता पक्षसंघटनेच्या बळावरच उमेदवारांना त्यांची प्रचारयंत्रणा राबवावी लागणार आहे. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सरासरी तीन ते साडेतीन लाख मतदार आहेत. यात नवमतदारांची संख्या मोठी आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता हा मतदारच पुण्याचा खासदार ठरवणार आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्याची प्रभावी साधन कोण प्रभावीपणे वापरणार यावर निवडणुकीचे चित्र पालटणार आहे. पुण्यातील मतदार सुशिक्षित आहे, शहरातील प्रश्‍नांसोबतच त्याला राष्ट्रीय प्रश्‍नांची जाण आहे. शहरातील वाहतुकीच्या कोंडीपासून शहरी गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी उमेदवार काय सांगणार याकडे त्यांचे लक्ष असेल. त्यामुळे थापा नाही, उमेदवाराला ‘कामचं’ दाखवावे लागेल, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com