Loksabha 2019 : आचारसंहिता भंग प्रकरणी महामेट्रोचे ब्रिजेश दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल 

0.jpg
0.jpg

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील मेट्रो लवकरात लवकर सुरू होईल, असे सांगत महामेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आचारसंहितेचा भंग केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार, दीक्षित यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. 

केंद्रीय निवडणुक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा करुन आचारसंहिता लागू केली होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी घोले रस्ता परिसरात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये दीक्षित यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. दीक्षित यांनी स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा आराखडा तयार असून आगामी आठवड्यात यासंबंधीचा अहवाल महापालिकेकडे सादर केला जाणार असल्याचे सांगितले होते. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही दीक्षित यांनी मेट्रो प्रकल्पाबाबतची घोषणा केली. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा प्रकार एका संघटनेने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या प्रकरणाची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दीक्षित यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसुल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये दीक्षित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

"लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दीक्षित यांच्याविरुद्ध कलम 188 नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.''
-  दीपक लगड, पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com