Loksabha 2019 : स्थानिक मुद्द्यांवरच प्रचाराचा भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांवरच प्रामुख्याने प्रचाराचा भर आहे.

पुणे - नोटाबंदी, राफेल गैरव्यवहार, वस्तू व सेवा कर (जीएसटी) आदी मुद्द्यांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय स्तरावर होत असली; तरी पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांवरच प्रामुख्याने प्रचाराचा भर आहे. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा बैलगाडा शर्यत, २२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, वाहतूक कोंडी आदी मुद्द्यांनी प्रचारात जोर धरला आहे.

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल, मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार, शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात आहेत. पुण्यात भाजपकडून गिरीश बापट आणि काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून प्रचाराला सुरवात झाली आहे. काँग्रेसचाही उमेदवार जाहीर होण्यापूर्वीपासून प्रचार सुरू आहे.

बारामतीमध्ये सुळे आणि कुल यांचे नातेसंबंध आहेत. नातेसंबंध असल्यामुळे त्यांच्याकडून वैयक्तिक टीका टाळली जात आहे. शिरूरमध्ये आढळराव आणि कोल्हे यांच्यात सुरवातीला झालेली वैयक्तिक टीका सोडली, तर प्रचारात स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. मावळमध्ये बारणे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मुलगा पार्थसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पवार यांचा भर वैयक्तिक संपर्कावर आहे.

राष्ट्रीय स्तरावर राफेल विमान खरेदीमधील गैरव्यवहार, ‘जीएसटी’मुळे मंदावलेला व्यापार, नोटाबंदीचा फटका, शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा आदी मुद्दे चर्चेत आहेत. 

शहर-जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांत स्थानिक मुद्देच प्रभावी ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. उमेदवारांचा प्रचार हा स्थानिक मुद्द्यांभोवतीच फिरत आहे. विद्यमान खासदारांचा भर त्यांनी आणलेल्या विकास योजना, केलेली कामे, सामाजिक उपक्रम यावर आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून प्रलंबित प्रश्‍नांवर भर दिला जात आहे.

Web Title: Mainly campaigning for local issues in Pune, Baramati, Maval and Shirur Lok Sabha constituencies is mainly on the campaign