Loksabha 2019 :  मावळ काँग्रेसची राष्ट्रवादीबाबत नाराजी

Loksabha 2019 :  मावळ काँग्रेसची राष्ट्रवादीबाबत नाराजी

तळेगाव दाभाडे  - आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तडजोड मित्रपक्षाने स्वीकारल्यास लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून झोकून देऊन काम करायचे; अन्यथा वेळ पडल्यास नैतिकता सोडून वेगळा निर्णय करायचा, असा पवित्रा शहर काँग्रेसच्या येथील बैठकीत घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा सूर बहुतेकांनी आळवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षीय धोरण व निवडणुकीच्या प्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी तळेगाव शहर काँग्रेसच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे होते. आपला प्रमुख शत्रू भाजप असून, आपणाला आघाडीचे धोरण निष्ठेने पाळावयाचे आहे, असे खळदे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कारभारावरही त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी गेली तीस वर्षे शहर विकास समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवते. त्यात मित्र पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा अनुभव आहे. गेली २५ वर्षे तालुक्‍यात राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे उमेदवाराचा पराभव होतो. मात्र खापर काँग्रेसवर फोडले जाते.’’

युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मित्र पक्षाकडून त्रास होत असेल तर आपली काय कथा, अशा शब्दांत खंत व्यक्त केली. इंदापूरसह मावळ मतदारसंघ विधानसभेसाठी सोडला जाणार असेल, तरच निष्ठेने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

चंद्रभान खळदे म्हणाले, ‘‘यापुढेही निष्ठेने काम करून आघाडीचा धर्म पाळू. आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा मतदारसंघ सोडण्याबाबतचे रीतसर निवेदन देण्यात येईल.’’ 

माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, कृष्णा कारके, जयसिंग भालेराव, उत्तम ओसवाल, विशाल दाभाडे, राम शहाणे, राजीव फलके आदींनी मनोगत व्यक्त केले. मित्र पक्षाकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही, नगर परिषदेच्या निवडणुकीत विश्‍वासात घेतले जावे, गेली २५ वर्षे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याने या वेळी काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रा. अनंत मोरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष ॲड. राजेंद्र पोळ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com