Loksabha 2019 : ‘शिवसेनेच्या रथाचे ‘लक्ष्मण’ होणार सारथी?’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

आपल्याला एक-एक ‘सीट’ महत्त्वाची आहे, अशी गळ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घातली. त्यांचे ऐकून जगताप राजी झाले. त्यामुळे ‘शिवसेनेच्या रथाचे ‘लक्ष्मण’ सारथी’ असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, प्रचारप्रक्रियेत जगताप सक्रिय झाल्यानंतरच खरे वास्तव समोर येणार आहे.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्याला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी उघडपणे विरोध केला. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला. पण, यश येत नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला एक-एक ‘सीट’ महत्त्वाची आहे, अशी गळ राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घातली. त्यांचे ऐकून जगताप राजी झाले. त्यामुळे ‘शिवसेनेच्या रथाचे ‘लक्ष्मण’ सारथी’ असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, प्रचारप्रक्रियेत जगताप सक्रिय झाल्यानंतरच खरे वास्तव समोर येणार आहे.

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे भाजपचे शहराध्यक्ष जगताप यांचे कट्टर विरोधक आहेत. यापूर्वीच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात उभे होते. त्यामुळे आताची परिस्थिती बिकट झाली. युतीमुळे बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ जगताप यांच्यावर आली. ते टाळण्यासाठी त्यांनी उमेदवार बदला किंवा मतदार संघ भाजपला देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यात यश न आल्याने त्यांच्यासह समर्थकही प्रचारापासून अलिप्त राहिले. बारणे यांची ‘एकला चलो रे’ मोहीम सुरू होती. परंतु, प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस शिल्लक राहिल्याने भाजपची सक्रिय साथ शिवसेनेला हवी होती. त्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत आदींनी जगताप यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपयोग होत नव्हता. अखेर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सायंकाळी जगताप यांची भेट घेतली. एक तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर जगताप प्रचारास तयार झाले.

Web Title: Maval loksabha constituency Laxman Jagtap will campaign to shrirang barne