तीन महिन्यांत तडीपारीची शंभरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक परिमंडळामध्ये सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यावर भर दिला जात असून, मागील तीन महिन्यांत शंभरहून अधिक जणांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक परिमंडळामध्ये सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यावर भर दिला जात असून, मागील तीन महिन्यांत शंभरहून अधिक जणांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. 

सराईत गुन्हेगारांच्या मदतीने मतदारांना धमकाविण्याचे किंवा त्यांच्याकडून अन्य गुन्हेगारी कृत्य होण्याची शक्‍यता गृहीत धरून पुणे पोलिसांनी जानेवारी महिन्यापासूनच ही कारवाई सुरू केली. प्रत्येक पोलिस ठाण्याकडून त्यांच्या हद्दीमधील सराईत गुन्हेगारांच्या नावाचे प्रस्ताव पोलिस उपायुक्तांना पाठविले जातात. त्यानंतर पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार संबंधितांना तडीपार करण्याची कार्यवाही केली जाते. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ, चोरी, जबरी चोरी, घरफोड्यांपासून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे यांसारखे विविध गुन्हे दाखल असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. 

परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाने दोन दिवसांत तिघांवर तडीपारीची कारवाई केली. सिद्धेश्‍वर उर्फ तोतो शहाजी जाधव उर्फ तौसिफ साजीद बागवान (वय 26, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी), समीर नैमुद्दीन अन्सारी (वय 25, रा. चव्हाण चाळ, घोरपडी पेठ) व अब्दुल उर्फ बाबा अमानुल्ला पठाण (रा. ताडीवाला रस्ता) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. 

मागील तीन महिन्यांत सहा जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा नियंत्रण कायद्यान्वये (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये या आठवड्यात खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय संजय जाधव (वय 32, रा. कासेवाडी) याच्याविरुद्ध "एमपीडीए'ची कारवाई करुन त्यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. याबरोबरच हडपसर, वानवडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टिपू पठाणच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का)अंतर्गत कारवाई करण्यात आली. 

परिमंडळ तडीपार गुन्हेगर 
1 - 14 (11 प्रस्तावाधीन) 
2 - 15 (12 प्रस्तावाधीन) 
3 - 16 
4 - --- 
5 - 05 (10 प्रस्तावाधीन) 

वर्ष तडीपार केलेले आरोपी 
2016 149 
2017 114 
2018 92 

एखाद्यास जखमी करण्यापासून अन्य गंभीर गुन्ह्यांमधील आणि दोनपेक्षा जास्त गुन्हे करणाऱ्या आरोपींवर तडीपारीची कारवाई केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारीपासूनच सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. 
- मंगेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन 

शंभरहून अधिक गुन्हेगारांची रोज हजेरी 
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर मागील एक-दोन वर्षांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोका) कारवाई करण्यात आल्याने बहुतांश टोळीप्रमुख सध्या कारागृहात आहेत. त्यांचे काही साथीदार बाहेर असून, त्यांच्यासह झोपडपट्टीदादा, अन्य सराईत गुन्हेगार व टवाळखोरांना पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या भागांतील पथकांसमोर हजेरी लावणे बंधनकारक केले आहे. सध्या शंभरहून अधिक गुन्हेगार रोज हजेरी लावत आहेत. 
 

Web Title: Police action against criminals on the condition of Lok Sabha elections