Loksabha 2019 : मतदानासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

मतदानप्रक्रिया पूर्ण होऊन ते मतमोजणी केंद्रापर्यंत पोचेपर्यंत आगामी ३६ तास पुणे अधिकाधिक रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असतील.

पुणे -  लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२३) होणाऱ्या मतदानासाठी पोलिस प्रशासनाकडून शेकडो पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे ताब्यात घेणे, मतदानप्रक्रिया पूर्ण होऊन ते मतमोजणी केंद्रापर्यंत पोचेपर्यंत आगामी ३६ तास पुणे अधिकाधिक रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असतील.

लोकसभा निवडणूकप्रकिया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने बंदोबस्त केला आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. मतदानप्रक्रियेमध्ये अनुचित घटना घडल्यास पाच ते दहा मिनिटांत पोलिसांच्या तुकड्या घटनास्थळी दाखल होतील. मंगळवारी सायंकाळी मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे अन्नधान्य महामंडळाच्या गोदामापर्यंत पोचेपर्यंत बंदोबस्त कायम असणार आहे.  

शहराची विभागणी बंदोबस्ताच्या दृष्टीने १२४ भागांत केली आहे. अनुचित घटना घडल्यास अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तत्काळ प्रतिसाद पथक (आयआरटी), तत्पर प्रतिसाद पथक (पीआरटी), गुन्हे प्रतिसाद पथक (सीआरटी), प्रादेशिक प्रतिसाद पथक (डीआरटी), विभागीय प्रतिसाद पथक (झेडआरटी) ही पथके घटनास्थळी पोचू शकतील. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबरोबरच अतिरिक्त पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्तांबरोबर खास शीघ्र कृती दल असेल.

शहरात गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या ७२७१ असून, काही दिवसांपासून त्यांची झाडाझडती घेण्यात येत आहे. पोलिसांकडून मागील महिन्यांत १८४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई  करण्यात आली आहे.

पोलिसांचे पोस्टल मतदान
पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तामध्ये असताना त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने पोस्टल मतदानाची व्यवस्था केली आहे. त्यामळे ४८९६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

पोलिसांच्या तुकड्या/पथके
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), रेल्वे सुरक्षा दल, मध्य प्रदेश पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल, नवप्रशिक्षित पोलिस, गडचिरोली पोलिस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्त वार्ता विभागांची पथके कार्यरत राहणार आहेत. 

‘स्ट्राँगरूम’साठी बंदोबस्त
पुणे व बारामती लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात जमा होतील. तेथे बंदोबस्ताची त्रिस्तरीय रचना केली आहे. त्यामध्ये मतदान यंत्रांजवळ केंद्रीय राखीव पोलिस दल, त्यानंतर काही अंतरावर राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी आणि बाहेर शहर पोलिसांचा बंदोबस्त असेल.

Web Title: Police security for voting in pune