Loksabha 2019 : बारामतीमधील घराणेशाही संपवा : प्रकाश आंबेडकर  

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 21 एप्रिल 2019

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल या नातेवाईक असून कोणीही निवडून आल्यास एकाच कुटुंबात सत्ता जाणार आहे.

दौंड (पुणे) : बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या नात्यातील सहा जण लोकसभा निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल या नातेवाईक असून कोणीही निवडून आल्यास एकाच कुटुंबात सत्ता जाणार आहे. त्यामुळे बारामती मधील घराणेशाही संपवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

शहरातील रेल्वे कामगार मैदानावर रखरखत्या उन्हात आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ आज (ता. 21) पार पडलेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी हे आवाहन केले. हरिभाऊ भदे, अण्णाराव पाटील, उत्तम गायकवाड, प्रकाश सोनवणे, अश्विन वाघमारे, मतिन शेख, हमीद शेख, राजाराम कदम, बी. वाय. जगताप, आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "बारामती मधील घराणेशाही संपली तरच आपल्या उमेदवारीची दारे खुली होणार असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते छुप्या पध्दतीने मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करीत आहेत. एकाच कुटुंबातील सहा - सहा लोक राज्य करणार असतील तर इतरांनी काय फक्त बॅगा बांधायच्या का?. याचा विचार करून नात्यागोत्याचे राजकारण चालवू नका. सत्तेत आल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा कायदा मोडल्याबद्दल आणि जनतेला लुटल्याबद्दल दोन दिवसांसाठी कोठडीत ठेवू. मोदी यांनी नोटबंदीच्या निमित्ताने काळे पैसेवाल्यांना लुटले असून त्यांना पुन्हा सत्ता दिल्यास ते कर भरणाऱ्या जनतेला पाच वर्ष लुटतील. नोटबंदीतून कमावलेल्या पैशातून भाजप या निवडणुकीत मत विकत घेत आहे. देशातील राजकारण हे जात आणि धर्मावर न चालता विकासाच्या कार्यक्रमावर चालले पाहिजे व त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी." 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Criticizes monopoly Pawar family in Baramati Constituency