Loksabha 2019 : पंतप्रधानपदी पुन्हा मोदी अशक्‍य - पृथ्वीराज चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

हिंदी भाषिक पट्ट्यात किमान 100 जागा भारतीय जनता पक्ष गमावणार असल्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा विराजमान होणे शक्‍य होणार नाही, असा पुनरुच्चार कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केला.

पुणे - हिंदी भाषिक पट्ट्यात किमान 100 जागा भारतीय जनता पक्ष गमावणार असल्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा विराजमान होणे शक्‍य होणार नाही, असा पुनरुच्चार कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. चव्हाण यांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची रणनिती, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार, आदी विषयांवर त्यांनी सविस्तर मते या वेळी मांडली. 

चव्हाण म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांत मोदींची काम करण्याची पद्धत पाहिली तर त्यातून त्यांची हुकुमशाही वृत्ती दिसून येते. नोटाबंदी, शेतकऱ्यांबाबतचे नकारात्मक धोरण, सरकारी संस्थांमधील लोकशाही त्यांनी नष्ट केली. हुकूमशाहीकडे त्यांचा प्रवास सुरू असून, आता निम्मा प्रवास झाला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशात हुकूमशाही येईल. पुन्हा निवडणुका होणार नाहीत व संविधान राहणार नाही. या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे.'' 

हवाई हल्ल्यांबाबत ते म्हणाले, ""या हल्ल्यांबाबत संरक्षण मंत्र्यांनाच माहिती नाही. विरोधक म्हणून आम्ही प्रश्‍न विचारणार. पण आम्हाला देशद्रोही ठरवून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राफेलचा करार मोदींच्या सहीने झाला आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राफेलमधील भ्रष्टाचाराबाबत आमच्याकडे पुरावे आहेत.'' 

कॉंग्रेस सोडून भाजपच्या आश्रयाला जाणाऱ्या नेत्यांबद्दल चव्हाण म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या साम, दाम, दंड, भेद या नितीमुळे अनेक राजकारणी भाजपमध्ये जात आहेत. स्वतःच्या संस्था आर्थिक अडचणीत आहेत, असे लोक पक्षाचा विचार न करता बंडखोरी करतात. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत आमचा निर्णय चुकला. परंतु, आता आम्ही तेथे ताकदीने लढणार आहोत.'' 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले 
- प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचा प्रभाव राज्यातही होईल 
- राज ठाकरेंचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी मोदींचा विरोध केला आहे 
- वंचित बहुजन आघाडीचा फायदा भाजपलाच होईल 
- सहकारी संस्थांशी संबंधित राजकारण्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पुण्यातील उमेदवारी अर्ज उद्या 
पुणे शहरातील उमेदवारी अद्यापही कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली नाही, त्याबाबत चव्हाण म्हणाले, ""एवढा उशीर होणे योग्य नाही. आम्ही दोन नावे सुचविली आहेत. परंतु, त्यावर निर्णय का होत नाही, हे माहिती नाही. पण कॉंग्रेसचा उमेदवार लवकरच जाहीर होईल आणि तो तीन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करेल.''

Web Title: Prime Minister Modi again impossible says prithviraj chavan