भाजपचा स्ट्राइक रेट धडकी भरवणारा

शुक्रवार, 24 मे 2019

भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला.

भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून दोन जिंकल्या. राष्ट्रवादीने पाच जागा लढवून दोन जिंकल्या आणि तीन जागा लढविणाऱ्या काँग्रेसच्या हाती भोपळाच आला. 

भाजपचे कार्यकर्ते गेली तीन वर्षे निवडणुकीची तयारी करत राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीत शिल्लक असलेले नेते फक्त उमेदवारीवर डोळा ठेवूनच निवडणुकीची वाट पाहत राहिले. युती आणि आघाडीमधील हा मूलभूत फरक निकालातून दिसला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला एक जागा गमवावी लागली असली, तरी भाजपच्या खात्यात एका जागेची वाढ झाली. या मतदारसंघांमध्ये मिळून विधानसभेच्या ४८ जागा आहेत. आजच्या निकालातून विधानसभेचा कल स्पष्ट समोर आला. 

सुजय विखे पाटील (नगर) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा) यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये अचूक उडी मारली. या दोन्ही जागांसाठी सर्वस्व पणाला लावून राष्ट्रवादीच्या हाती काहीही पडले नाही. उलट सुजय आणि रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे तरुण चेहरे आघाडीने गमावले. शिर्डीची जागा शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी सहजपणे कायम राखली.

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरात भाजपला फायदा होणार, असे आघाडीनेच सांगितले होते. भाजपच्या डॉ. जय सिद्धेश्‍वर महास्वामी यांचा विजय आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे पराभव यातील अंतर आंबेडकर ठरले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्यातील पहिला निवडणूक पराभव म्हणून पार्थ अजित पवार यांच्या नावाची नोंद मावळ मतदारसंघाने केली. शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंना सलग दुसऱ्यांदा विजय मिळण्यामागे युतीचे भक्कम पाठबळ कारणीभूत आहे. अजित पवारांचे पुत्र म्हणून जमलेले कार्यकर्तेच पार्थ यांच्याकडे होते. 
बारामतीमध्ये भाजपच्या सर्व प्रचाराला पुरून उरत सुप्रिया सुळे यांनी हिकमतीने तिसऱ्यांदा खासदारकी टिकवून ठेवली. हा मतदारसंघ भाजपने प्रतिष्ठेचा बनविला; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा टाळली. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी, भाजप उमेदवार कांचन कुल यांनी या मतदारसंघात चांगली लढत दिली. त्याची परतफेड भाजप नजीकच्या भविष्यात राहुल कुल यांना करेल, यात शंका नाही. 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री गिरीश बापट निवडणुकीत आग्रहाने पुण्यातून उतरले. शिस्तबद्ध यंत्रणा आणि काम या जोरावर त्यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तीन वेळचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले. डॉ. कोल्हे यांच्या स्वतःच्या प्रतिमेचा मोठा वाटा त्यांच्या विजयात राहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis article BJP was leading a strike rate