Loksabha 2019 :  पदयात्रा अन्‌ सोशल मीडियाची प्रचारात धूम!

Loksabha 2019 :  पदयात्रा अन्‌ सोशल मीडियाची प्रचारात धूम!

पुणे -  लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील सुमारे २१ लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, घरोघरी भेटीगाठी आदींवर भर देत प्रचार केला. गेल्या तीन दिवसांत मेळावे, सभा, रोड शोमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी सोशल मीडियावरील आक्रमक प्रचार यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्देही 
महायुतीतर्फे आलेल्या नेत्यांकडून प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावरील केंद्र सरकारच्या योजना, बालाघाटमधील लष्करी कारवाई, विकासकामे आदींवर भर देण्यात आला. तर आघाडीच्या नेत्यांकडून राफेल प्रकरण, नोटाबंदी, जीएसटी, स्मार्ट सिटी आदी मुद्द्यांवर केंद्र सरकारला लक्ष्य करण्यात आले. स्थानिक स्तरावर पाणी, वाहतूक, मेट्रो, स्मार्ट सिटी, प्रदूषण आदी मुद्दे प्रचारात येत होते.

लोकसभेसाठी पुण्यातील महायुतीचे गिरीश बापट यांची उमेदवारी २३ मार्चला, तर महाआघाडीचे मोहन जोशी यांची उमेदवारी ३१ मार्च रोजी निश्‍चित झाली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी मर्यादित कालावधीच मिळाला. त्यामुळेच पदयात्रा, रॅली, मेळाव्यांवर दोन्ही उमेदवारांनी भर दिला. त्यातच कडक उन्हामुळे सकाळी व सायंकाळी प्रामुख्याने पदयात्रा, रॅली झाली, तर दुपार आणि रात्रीच्या सत्रांत मेळावे, कोपरा सभा झाल्या. 

महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, शहानवाझ हुसेन, व्ही. के. सिंह, विनय सहस्रबुद्धे, विजया रहाटकर, डॉ. नीलम गोऱ्हे प्रचारात उतरले तर महाआघाडीतर्फे आनंद शर्मा, हुसेन दलवाई, कुमार केतकर, सोनल पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, फौजिया खान, विद्या चव्हाण यांनी प्रचारात सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सिंहगड रस्त्यावर जाहीर सभा घेऊन मोदी-शहा यांना विरोध केला. वंचित विकास आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित होते अन्‌ प्रचारातही त्यांनी भाग घेतला तर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उत्तम शिंदे सरकार यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष किरण आल्हाट यांनीही नुकतीच जाहीर सभा घेतली.

नरेंद्र मोदी, राहुल गांधीही पुण्यात !
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अकलूजला सभेसाठी जाण्यापूर्वी पुण्यात मुक्काम केला होता तर, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीमध्ये जाऊन झंझावाती रोड शो केला. याच दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून मोदींच्या कारभाराचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द झाला. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा रोड शो होणार होता; पण, तो झालाच नाही.

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com