Loksabha 2019: काँग्रेसला मिळतील जेमतेम शंभर जागा 

Loksabha 2019: काँग्रेसला मिळतील जेमतेम शंभर जागा 

गरीबांसाठी न्याय योजना, शासकीय रोजगाराची संधी, अर्थव्यवस्थेत सुधारणा अशी आश्‍वासने देत काँग्रेसने आक्रमक प्रचाराने देशभर राजकीय वातावरण तापविले आहे. सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतानाच राहूल व प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशावर थेट हल्ला सुरू ठेवला आहे. तरीदेखील देशभरातील लढतींचा अंदाज घेतल्यास, काँग्रेसला शंभर ते सव्वाशेच्या दरम्यानच जागा मिळण्याची शक्‍यता आहे. 

राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा मांडत आक्रमक पवित्रा घेतलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी, शेतकरी व बेरोजगार यांना डोळ्यासमोर ठेवत आश्‍वासकपणे सादर केलेला जाहीरनामा, गेल्या वर्षी चार राज्यांत मिळालेली सत्ता, उत्तर प्रदेशाची प्रियांका गांधी यांनी सांभाळलेली जबाबदारी, तसेच मित्र पक्षांचा पाठिंबा या जोरावर कॉंग्रेसची आगेकूच सुरू झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, बिहारमध्ये राजद, केरळातील जुने सहकारी पक्ष या युपीएतील घटक पक्षांसोबतच आता कर्नाटकात जनता दल (सेक्‍युलर) आणि तमीळनाडूत द्रमुक हे ताकदवान प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत आहेत. तरीदेखील प्रादेशिक पक्ष ताकदवान असलेल्या उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, ओरीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांत कॉंग्रेसची स्थिती तुलनेने कमकुवत आहे. 

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती आता बरीच सावरली आहे. कर्नाटक, गुजरातच्या निवडणुकांपासूनच राहूल गांधी यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा स्वीकार केला. हातातून निसटलेले कर्नाटक जनता दल (सेक्‍युलर) च्या साह्याने सावरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये त्यांनी अटीतटीची लढत दिली. भाजपची सत्ता असलेली मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही हिंदी बेल्टमधील राज्ये चार महिन्यांपूर्वी कॉंग्रेसने खेचून घेतली. काँग्रेसमुक्त भारत या भाजपच्या घोषणेला दिलेले हे सणसणीत उत्तर होते. पंजाबमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आहे, तर पॉंडेचरीत द्रमुकच्या पाठिंब्यावर सरकार चालविताना त्यांनी तमिळनाडूतही द्रमुकसमवेत आघाडी केली. 

टार्गेट "मोदी' 
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, तसेच मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येऊ नयेत, हा उद्देश ठेवूनच कॉंग्रेसचा प्रचार सुरू असल्याचे जाणवते. मोदी गेल्या निवडणुकीत देशभर काँग्रेसवर घणाघाती हल्ला करीत फिरत होते. विकास, अच्छे दिन यांसारख्या मुद्‌द्‌यांवर त्यांचा भर होता. त्यावेळी काँग्रेसकडून फारसा प्रतिकार होत नव्हता. काँग्रेसकडे वक्तेही कमी होते. आता राहूल गांधीची भाषणशैली आक्रमक झाली आहे. ते मोदींना प्रश्‍न विचारीत आहेत. प्रियांका गांधीही केंद्र सरकारने पाच वर्षांत काही काम केले नाही, या मुद्‌द्‌यांवरच भर देत आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात प्रचाराची जबाबदारी सांभाळली आहे.

मोदी करीत असलेल्या हल्ल्यांना उत्तरे न देता, आपले मुद्दे मांडण्यावरच काँग्रेसने भर दिल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजपच्या प्रचाराच्या जाळ्यात विरोधक अद्यापतरी सापडलेले नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा गेले काही वर्षे ऐरणीवर आहे. काँग्रेसच्या राज्यात तातडीने कर्जमाफी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याचे त्यांनी जाहीरनाम्यात नमूद केले. 22 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन देत कॉंग्रेस शेतकरी, बेरोजगार, व सर्वसामान्य गरीबांच्या मुद्‌द्‌यांना हात घालत आहे. अशी चांगली स्थिती असतानाही काँग्रेसच्या जागा किती वाढणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती खरोखरच शोचनीय झाली. दहा वर्षांच्या सत्तेनंतर केवळ 44 जागा त्यांच्या पदरात पडल्या. त्यांच्या मित्रपक्षांनाही केवळ 16 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला कर्नाटक (9), केरळ (8), पश्‍चिम बंगाल (4), पंजाब, आसाम (प्रत्येकी तीन), बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तेलंगणा, मणीपूर (प्रत्येकी दोन), छत्तीसगड, हरियाना, अरुणाचल प्रदेश, मेघालय व मिझोराम (प्रत्येकी एक) अशा एकूण 44 जागा मिळाल्या. काँग्रेसने 464 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 13 जागांच त्यांनी लाखापेक्षा जास्त मताधिक्‍यांनी जिंकल्या. 223 जागांवर ते दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी त्यापैकी 157 ठिकाणी त्यांच्या पराभव लाखापेक्षा जास्त मताधिक्‍याने झाला होता. उर्वरीत 182 जागांवर तर ते तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होते. 2009 मध्ये कॉंग्रेसचे खासदार असलेल्या 109 जागा भाजपने जिंकल्या होत्या. अशा दारूण स्थितीतून पुन्हा ताकदीने उभारणे अवघडच आहे. 

काँग्रेसची सद्यस्थिती
काँग्रेसने नुकत्याच जिंकलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तसेच अटीतटीची लढत दिलेल्या गुजरात या राज्यांत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी तीन जागी कॉंग्रेसचे खासदार होते, तर पोटनिवडणुकीत राजस्थानात त्यांनी दोन जागा जिंकल्या. या चार राज्यांत काँग्रेस यावेळी किमान 30 ते 35 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. पंजाबमध्ये तीन जागा असून, तेथे आणखी तीन-चार जागा वाढतील. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आपशी आघाडी झाल्यास, तेथील सातपैकी काही जागा मिळतील. दक्षिणेतील पाच राज्यांत कॉंग्रेसकडे 19 जागा, तर मित्रपक्षांकडे सहा जागा आहेत. या राज्यांत एकूण 129 जागा असल्या, तरी तेलंगणा व आंध्रप्रदेशात जागा वाढण्याची चिन्हे नाहीत. कर्नाटकात जास्तीत जास्त दोन-तीन जागा वाढतील. केरळात 20 पैकी 12 जागा युपीएकडे असल्यामुळे, तेथे डाव्या आघाडीसमोर लढताना फारशी वाढ अपेक्षित नाही. राहूल गांधीही केरळमधील वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तमिळनाडूत द्रमुकच्या मदतीने कॉंग्रेस दहा जागा लढवीत असून, तेथे काही जागा त्यांना मिळतील. 

उत्तरप्रदेश, बिहार या मोठ्या राज्यांत अटीतटीच्या लढती होणार आहेत. उत्तर प्रदेशात सत्तारूढ भाजपसमोर सप-बसप यांच्या आघाडीने आव्हान उभारले आहे. प्रियांका गांधीनी प्रचार सुरू केल्याने, तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले असले, तरी किती मतदारसंघांत कॉंग्रेस विजयापर्यंत पोहोचेल, ते तेथील तिरंगी लढतीवर अवलंबून राहील. अन्य पक्षांतून आलेल्या काही मातब्बर नेत्यांनाही कॉंग्रेसने यंदा उमेदवारी दिली आहे. तेथे कॉंग्रेसला आठ-दहा जागा मिळतील. बिहारमध्ये आघाडीत राजद मुख्य पक्ष आहे. कॉंग्रेसचे तेथे दोन खासदार असून, नऊ जागांवर त्यांचे उमेदवार आहेत. भाजप-जनता दल या सत्तारुढ आघाडीशी त्यांचा सामना आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतून काँग्रेसच्या संख्येत भरीव वाढ होण्याची फारशी शक्‍यता नाही. लगतच्या झारखंड, उत्तराखंड या राज्यांवर येथील वातावरणाचा परिणाम होतो.

महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी ताकदवान असली, तरी भाजप - शिवसेना युतीकडून जागा मिळविताना त्यांची दमछाक होणार आहे. येथे काँग्रेसच्या पाच-सहा जागा वाढण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम बंगाल, ओरीसा या राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर असून, तेथे भाजपची ताकद वाढू लागल्याने, काँग्रेसचा पाठिंबा घटला आहे. कॉंग्रेसच्या या राज्यात चार जागा असून, त्या वाढण्याची शक्‍यता कमीच आहे. ईशान्य भारतातील सात राज्यांत 25 पैकी आठ जागा काँग्रेसकडे असून, त्या टिकवितानाच त्यांची दमछाक होणार आहे. अन्य राज्यांत तुलनेने कमी जागा आहेत. ही स्थिती लक्षात घेतल्यास, कॉंग्रेसच्या जागा शंभर ते सव्वाशेच्या आसपास येतील, अशीच सध्यातरी चिन्हे आहेत. 

लोकसभेच्या 1996 ते 2004 पर्यंतच्या चार निवडणुकांत काँग्रेसच्या जागा 114 ते 145 यादरम्यान होत्या. 2004 मध्ये 145 जागा असताना, भाजपला 138 जागा मिळाल्या आणि काँग्रेस तिसऱ्या आघाडीच्या मदतीने सत्तेवर आली. 2009 मध्ये कॉंग्रेसने प्रथमच दोनशेचा टप्पा ओलांडत 206 जागा मिळविल्या. भाजपनेही 1996 ते 2009 दरम्यान कधीही दोनशेचा टप्पा ओलांडला नव्हता. 1999 मध्ये 182 जागा जिंकत ते सत्तेवर आले होते. 2014 मध्ये विरोधकांच्या 166 जागा जिंकत भाजपने 282 जागा मिळवून एकहाती बहुमत मिळविले. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या किती जागा रोखण्यात विरोधकांना यश येते, त्यावरच केंद्रात सत्तेवर कोण येणार, ते निश्‍चित होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com