Loksabha 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढत

सचिन जोशी
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    केळीवरील प्रक्रिया उद्योग नाहीत
    केळी वाहतुकीचा प्रश्‍न कायम
    सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या रावेर मतदारसंघात अन्य उमेदवार असले, तरी खरी लढत भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यातच होईल. स्नुषाच उमेदवार असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची, तर प्रयत्नपूर्वक रावेरची जागा काँग्रेसकडे आल्याने आणि तीनदा पराभवानंतर ‘आता नाही तर कधीच नाही’ म्हणून डॉ. पाटील यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची आहे.

गेल्या दोन पंचवार्षिक वगळता रावेर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस असाच सामना प्रत्येक वेळी रंगत आला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत एकमेव अपवाद वगळता भाजपने मतदारसंघावर वर्चस्व राखलंय. संपूर्ण मतदारसंघावर एकनाथ खडसे यांचा प्रभाव, संघटनात्मक मजबुती यामुळे भाजपला हा मतदारसंघ सोपा मानला जातोय. परंतु, प्रत्येक वेळी हीच स्थिती राहील, असे नाही. काही वर्षांत मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

एकतर जिल्हा भाजपवर खडसे यांचा एकछत्री अंमल राहिलेला नाही. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पक्षावर नाराज आहेत, त्यातून पक्षविरोधी विधानांमुळे पक्षही त्यांच्यावर तेवढाच नाराज आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यामधील गटबाजीचीही डोकेदुखी आहे. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे खडसे यांचे कट्टर विरोधक. त्यामुळे युती होऊनही ते खडसे परिवारातील सदस्य असलेल्या रक्षा यांचा प्रचार करण्याची शक्‍यता नाहीच. युती धर्म म्हणून केवळ संयुक्त सभांमधून ते दिसतील, त्याचा थेट लाभ डॉ. पाटील यांना मिळू शकेल. 

दुसरीकडे डॉ. पाटील यांनी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मदत घेण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. सर्वांना विश्‍वासात घेतल्याने त्यांना ‘राष्ट्रवादी’कडून अपेक्षित मदत मिळू शकेल, असे चित्र आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराचा भर वैयक्तिक भेटींवर ठेवला असून, यात मतदारसंघातील विकासाचे प्रश्‍न, प्रलंबित योजना आणि प्रकल्पांचा उल्लेख होतो. परंतु, हे प्रचाराचे मुद्दे आहेत. प्रत्यक्षात मतदान केंद्रात कोणते सरकार हवे आणि जातीच्या मुद्यावरच होते, असाही अनुभव आहे. 

मराठा आणि लेवा समाज बहुल अशा या मतदारसंघात अनेक वर्षे लेवा समाजाचा उमेदवार निवडून येत आहे. रक्षा खडसे आणि डॉ. पाटील दोन्ही लेवा समाजाचे असले तरी हा समाज एकाच उमेदवाराकडे कल देतो. मराठा समाजासह गुजर, माळी, कोळी समाजाची मते निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. वंचित आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर किती मते घेतात, यावरही विजयाचे गणित अवलंबून असेल. 

काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची या मतदारसंघात भुसावळ येथे गुरुवारी (ता. १२) सभा होत आहे, त्यातून चित्र बदलू शकेल. त्यानंतर भाजपलाही स्टार प्रचारक म्हणून एक-दोघा नेत्यांच्या सभा घ्याव्या लागतील, तसे नियोजन भाजपकडून सुरू आहे. भाजप-काँग्रेसपेक्षा खडसे आणि डॉ. पाटील अशी व्यक्तिगत स्तरावर ही लढत रंगत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP Congress Politics