Loksabha 2019 : भाजपचा प्रचाराचा झंझावात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर, भगवाननगर, ओंकारनगर, अमरनगर, उदयनगर, म्हाळगीनगर, दिघोरी चौक, मंगलमूर्ती लॉन आदी परिसरातून मार्गक्रमण करीत गेलेल्या या रॅलीचे सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आले. गडकरी यांच्या विकासदृष्टीमुळे नागपूरचा कायापालट होतोय. त्यामुळे नागपूरची जनता त्यांना भरगच्च मतांनी निवडून देणार, असा विश्‍वास या परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते.

संपर्क रॅलीत आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मोहन मते, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, किशोर कुमेरिया, विठ्ठल भेदे, डॉ. रवींद्र भोयर, संजय ठाकरे, रमेश सिंगारे, नगरसेविका दिव्या धुरडे, उषा पायलट, संजय भेंडे, शरद बांते, नीता ठाकरे, भारती बुंडे, विशाखा बांते, वंदना भगत, स्वाती आखतकर यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वयंस्फूर्तीने अनेकांचा पुढाकार
जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या नावावर राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही. समाजातील गरिबातल्या गरीब माणसाचे कल्याण आणि नागपूरसह संपूर्ण राष्ट्राचा विकास हेच एकमेव ध्येय असल्याने नागपूरच्या विविध क्षेत्रांतील लोक स्वयंस्फूर्तीने समर्थनासाठी पुढे येत आहेत. यामुळे नागपूरची जनता विकासाच्या पाठीशी उभी आहे. माझ्यावर शंभर टक्के विश्वास टाकत असल्याने मी भारावून गेलो आहे, असे भावोद्‌गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. आर्य वैश्‍य समाज, नौजवान मुस्लिम तंजीम कमिटी, मातंग समाज एकता मंडळ, मन्नेवार समाज सेवा संघ, पारसी समाजकल्याण समिती, भोई समाज महासंघ, कान्यकुब्ज वैश्‍य समाज, अखिल भारतीय बहुजन समाज, अनु. जाती., जमाती, अल्पसंख्याक विकास परिषद, महाराष्ट्र किराड किरात  समाज, मानवाधिकार संरक्षण संस्था, मानवाधिकार नॅशनल पार्टी, नागपूर मेमन जमात, क्षत्रिय कासार समाज अशा अनेक संघटनांनी मला समर्थन पत्र दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP Publicity Politics Nitin Gadkari Rally