Loksabha 2019 : उमेदवार बदलताच लढतीचे चित्रही बदलले

Blau-and-Hansraj
Blau-and-Hansraj

काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ, त्यातून आलेली नाराजी एका बाजूला आणि भाजप उमेदवाराची प्रचारातील आघाडी दुसरीकडे, यामुळे मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे...

काँग्रेसने घोषित केलेला उमेदवार शेवटच्या क्षणी बदलून त्यांच्याऐवजी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आणि लढतीचे चित्रच बदलून गेले. भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता काट्याच्या लढतीत परावर्तित झाली. चारदा खासदार झालेले आणि सलग पंधरा वर्षे निवडून येणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विजयात नेहमीच मतविभाजनाचा वाटा राहिलाय. या वेळी लढत थेट आहे. चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेस संघटनात्मक पातळीवर खिळखिळी आहे. याउलट भाजपने निवडणुकीला सामोरे जाताना सूत्रबद्ध नियोजन केले.

धानोरकरांसारखा आक्रमक चेहरा काँग्रेसला मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मतदारांसमोर जाताना त्यांची पाटी कोरी आहे. 

माजी खासदार नरेश पुगलिया वगळून सारे गटतट एकत्र आलेत. धानोरकरांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांच्यासोबत आहे. 
मतदारसंघात सहापैकी पाच आमदार भाजपचे आहेत. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत. लोकसभेच्या रणांगणातील ही महत्त्वाची आयुधे अहिरांची शक्तिस्थळे आहेत. मात्र, या वेळी मोदी लाटेचा प्रभाव दिसत नाही. त्यांच्या विरोधात ‘ॲन्टी इन्कम्बसी’सुद्धा आहे. २०१४ मध्ये मोदीत लाटेतसुद्धा काँग्रेसच्या पारंपरिक मतदार टिकून राहिला.

त्यामुळे विजयाचे अंतर फार कमी राहील, अशी शक्‍यता आहे. बहुजन वंचित आघाडीचे राजेंद्र महाडोळे किती मजल मारतील, याची उत्सुकता काँग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये आहे. 

भाजपची बलाढ्य आणि आक्रमक प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे, आर्थिक पाठबळ या आव्हानांना काँग्रेस कशी तोंड देईल, यावरच या लढतीचा निकाल अवलंबून राहील. मतदारसंघात जातीचे समीकरण कधी चालले नाही.

विनायक बांगडेंची उमदेवारी ऐनवेळी काँग्रेसने बदलली. त्यामुळे तेली समाजात नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी समाजातील भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत, दुसरीकडे याच समाजातील काँग्रेसच्या नेत्यांचा त्याला विरोध आहे. 

चटपांची मते जाणार कुठे?
गेल्या वेळी आम आदमी पक्षाचे ॲड. वामनराव चटप यांनीही दोन लाखांवर मते घेतली. ते आता रिंगणात नाहीत. काँग्रेस आणि ‘आप’ची मते ही भाजपविरोधी होती, हे गृहीत धरले, तर या मतदारसंघात मोदी लाट प्रभावी ठरली नाही, असे जाणकार म्हणतात. या दोन्ही मतांची बेरीज केल्यास केवळ तीन टक्‍क्‍यांच्या फरकाने अहिर निवडून आले. आता चटप यांची मते कुणाकडे वळतील, याची उत्सुकता आहे.

उमेदवाराची बलस्थाने
हंसराज अहिर (भाजप) - दांडगा जनसंपर्क. मतदारसंघातील बहुतांश गावांत मागील पंधरा वर्षांत पोचलेला उमेदवार. कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ. पक्षाचे एकदिलाने काम करणारी प्रचार यंत्रणा.

बाळू धानोरकर (काँग्रेस) - तरुण, नवा चेहरा. एक मतदारसंघ वगळता पाटी कोरी. सामाजिक समीकरण अनुकूल.

स्थानिक प्रश्‍न
कोळसा खाणीमुळे प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर.
‘वेकोली’ प्रकल्पग्रस्तांच्या न सुटलेल्या समस्या.
पुणे, मुंबईसाठी थेट रेल्वेगाडी नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुके मतदारसंघात; पण शेतकरी आत्महत्येवर तोडगा नाही.
पांढरकवडा पट्ट्यातील अनुत्तरित कुमारी मातांचा प्रश्‍न.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com