Loksabha 2019 : ‘विकासाचा विश्‍वास’ निर्माण करणाऱ्याचीच सरशी

वीरेंद्रकुमार जोगी
बुधवार, 3 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न

  • संत्रा प्रक्रिया कारखान्याचा प्रस्ताव रखडलेलाच
  • औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांअभावी बेरोजगारीची समस्या
  • नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादकांना सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न
  • दुष्काळग्रस्त तीन तालुक्‍यांतील शेतकरी मदतीपासून वंचित

जाणकार मंडळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख ‘ट्रेंडी’ असा करतात. मतदारांमध्ये ‘आपला माणूस’ म्हणून विश्‍वास निर्माण करणाराच रामटेक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, असा आजवरचा ‘ट्रेंड’ आहे. परंतु, या वेळी विकासाचा विश्‍वास जो निर्माण करेल, तोच सरस ठरेल, असे चित्र दिसत आहे. 

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यामध्ये थेट लढत आहे. ‘बसप’चे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे (पाटणकर) यादेखील रिंगणात आहेत. सुरुवातीला काँग्रेसच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा काँग्रेससमर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा होता. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना जिल्ह्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांचे समर्थन मिळत असले, तरी भाजप कार्यकर्त्यांचा विरोध डोकेदुखी वाढवीत होता. आता प्रचाराचा धुरळा उडू लागला, तसे युती व आघाडीचे कार्यकर्ते ‘विजय आमचाच’ असे दावे-प्रतिदावे करीत आहेत.  

रामटेक मतदारसंघात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. शेतीचे प्रश्‍न कायम असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोदी लाट ओसरल्याचे तूर्तास चित्र आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. बहुतांश तालुक्‍यांतील विविध मंडळांतही दुष्काळी स्थिती आहे. शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, नुकसान भरपाई याच विवंचनेत अडकलाय. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या ओस आहेत. विद्यमान आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे दुष्काळग्रस्त काटोल मतदारसंघात लोकप्रतिनिधीच नाही. औद्योगिकदृष्ट्या आघाडीवरील नागपूर जिल्ह्यात विकासाचे मुद्दे मांडत, बेरोजगारी संपवण्याचा दावा कोणता उमेदवार अधिक जोरकसपणे करतो, यावर त्याचा विजय सुकर होईल.

मतदारांपर्यंत पोचणे आव्हान 
तुमाने यांची ही तिसरी निवडणूक आहे. किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवखा आहे. त्यांना प्रचार करण्याशिवाय पर्याय नाही. तथापि, तुमाने यांच्यासमोर त्यांनी केलेली कामे घेऊन जाण्यासाठी प्रचार हेच एकमेव माध्यम आहे. उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ९ हजार ६०० चौरस किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. १३ तालुक्‍यांतील १ हजार ८७२ गावांसह १९ नागरी क्षेत्रातील १८ लाख मतदारांसमोर पोहोचण्यासाठी उमेदवार डिजिटल प्रचारावर भर देत असले, तरी तो किती प्रभावी ठरेल, याचा निकालही २३ मे रोजीच लागेल.

Web Title: Loksabha Election 2019 Development Krupal Tumane Kishor Gajbhiye Politics