Loksabha 2019 : निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे हाल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेत नाश्‍ता, जेवण मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातल्या त्यात मिळणारे अन्नही बेचव असल्याचे सांगितले जाते. या साऱ्या प्रकारात घोळ असल्याची चर्चा रंगली आहे.

नागपूर - निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेत नाश्‍ता, जेवण मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातल्या त्यात मिळणारे अन्नही बेचव असल्याचे सांगितले जाते. या साऱ्या प्रकारात घोळ असल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी २८ ते ३० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. निवडणूक योग्यरीत्या पार पाडावी म्हणून शेकडो अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. सकाळी आलेले कर्मचारी रात्री १२, १ वाजता घरी जात आहेत. या कर्मचाऱ्यांचा नाश्‍ता आणि जेवणाची सोय करण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर निवडणूक यशस्वी करायची आहे, त्या कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी जेवण मिळत नसल्याचे चित्र आहे. 

काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना रात्री बारा, एक वाजता जेवण देण्यात आले. आता मिळणारे जेवण बेचव असल्याची ओरड होत आहे. अनेक कर्मचारी बाहेर नाश्‍ता, जेवण करीत असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस चव घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून घरूनच डबा बोलविण्यास सुरुवात केली. काही कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचीच ‘री’ ओढली. एकीकडे जेवणावर लाखो रुपये खर्च होत असताना बेचव जेवणावरून या प्रकारात घोळ होत असल्याची चर्चा रंगली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Election Activists Food