Loksabha 2019 : गेमच्या भीतीने रामटेक ‘होल्ड’वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

नागपूर - काँग्रेसच्या उमेदवारीवरून विदर्भात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबाबतंत्रामुळे चंद्रपूरचा उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला असून रामटेकमध्येही अशीच स्फोटक स्थिती आहे. त्यामुळे येथील उमेदवाराचे नाव ‘होल्ड’वर ठेवण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

रामटेकमधून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक स्वतः लढण्यास इच्छुक होते. तसे संकतेही त्यांनी दिले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फक्त त्यांचेच नाव पाठविले होते. विशेष म्हणजे वासनिक येथून एकदा निवडून आले तर एकदा पराभूत झाले आहेत. काँग्रेसला जिंकायचे असेल तर वासनिकांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांचे समर्थक करीत आहेत. पत्रकार  परिषद घेऊनही मागणी केल्या जात आहे.

सोबतच दुसरा उमेदवार दिल्यास पराभवाची शक्‍यताही वर्तवीत आहे. दुसरीकडे राज्यातील माजी मंत्री तसेच अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे दावा ठोकला आहे. वासनिकांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी द्यायची नसल्याचे बोलल्या जाते. मात्र, राऊत माघार घ्यायला तयार नाहीत. त्यांनीही दिल्लीत जोरदार फिल्डिंग लावली आहे. तिसरा पर्याय म्हणून बसपतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र, कोणाचेही नाव जाहीर केल्यास थेट श्रेष्ठींपर्यंत तक्रारी करून विरोध होण्याची शक्‍यता आहे. चंद्रपूरमध्ये विशाल मुत्तेमवार यांच्या नावाला काँग्रेस वर्किंग कमिटीने हिरवी झेंडी दाखवली होती. फक्त अधिकृत घोषणा व्हायची शिल्लक राहिली होती. विशाल यांचा नागपूर विमानतळावर सत्कारही करण्यात आला होता. ही वार्ता कळताच चंद्रपुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला. बाहेरचा उमेदवार लादल्यास काम करणार नाही, राजीनामा देऊ असा इशाराच स्शानिक पदाधिकाऱ्यांनी दिला. 

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना एसएमएस व ट्विट करून याची माहिती देण्यात आली. त्यानंतर  मुत्तेमवार यांनी स्वतःच माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे तिकीट पक्के झाले अशी चर्चा असतानाच विनायक बांगडे यांचे नाव जाहीर केले. मात्र, त्यांनाही विरोध करणे सुरू झाले आहे. रामटेकमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याऐवजी त्याला थेट एबी फॉर्म दिला जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics Congress Candidate