Loksabha 2019 : स्टार प्रचारकांच्या सभांनी तापणार एप्रिल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा, गोंदियातून प्रचाराचा नारळ फोडणार असून, शहरात अमित शहा, प्रियांका गांधी, मायावती यांच्या सभाही निश्‍चित झाल्या आहेत. या प्रमुख नेत्यांसह इतर राष्ट्रीय नेत्यांचीही मांदियाळी राहणार आहे.

नागपूर - रामटेक, नागपूरसह विदर्भात राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये भाजप, काँग्रेस, बसप, बहुजन वंचित आघाडीच्या स्टार प्रचारकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा, गोंदियातून प्रचाराचा नारळ फोडणार असून, शहरात अमित शहा, प्रियांका गांधी, मायावती यांच्या सभाही निश्‍चित झाल्या आहेत. या प्रमुख नेत्यांसह इतर राष्ट्रीय नेत्यांचीही मांदियाळी राहणार आहे. 

विदर्भात वर्धा येथे १ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेणार आहेत. या सभेसाठी ते नागपूरमार्गे वर्धा येथे जातील. ३ एप्रिल रोजी गोंदिया येथेही त्यांची सभा निश्‍चित करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही नागपुरात सभेसाठी होकार दिल्याचे भाजपच्या गोटातील सूत्राने नमूद केले. दुसरीकडे काँग्रेसतर्फे सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा व रोड शो ४ किंवा ६ एप्रिलला होण्याची शक्‍यता आहे. बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती ५ एप्रिल रोजी कस्तूरचंद पार्क येथे सभा घेणार आहे. बसप-समाजवादी पक्षाची युती असल्याने त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सोमवारी, १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होणार आहे.

याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एमआयएमचे असुदुद्दीन ओवेसी यांच्याही नुक्कड सभा होणार आहेत. भाजपसाठी स्टार प्रचारक हेमामालिनी, स्मृती इराणी यांच्याही सभा होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Star campaigner Speech Politics BJP Congress BSP