Loksabha 2019 : इच्छुकांची भाऊगर्दी डोकेदुखी वाढवणार

राजेश चरपे
रविवार, 28 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने काही महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची इच्छुकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोर्चेबांधणी, आडाखे-अंदाज बांधून चाचपणी केली आहे. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला कसरत करावी लागेल. 

गत विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेमुळे शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांतून भाजपचेच आमदार निवडून आले. नितीन गडकरी यांना यापैकी कोण किती मताधिक्‍य मिळवून देणार, यावर त्यांची फेरउमेदवारी ठरण्याची शक्‍यता आहे. पावणेतीन लाखांचे मताधिक्‍य टिकवणे गडकरींना या वेळी आव्हानात्मक आहे. खास करून पश्‍चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत फटका बसण्याची शक्‍यता वर्तवली जाते. दुसरीकडे नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसला विधानसभेच्या काही मतदारसंघांत खाते उघडेल, अशी आशा वाटते. त्यामुळे इच्छुक आणि दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी लोकसभेत जोरदार प्रचार केला. 

गडकरींना सर्वाधिक मताधिक्‍याची पूर्व नागपूरमधून आशा आहे. सध्याची आकडेवारीसुद्धा तसे दर्शवीत आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपला मतदारसंघ चांगलाच बांधून ठेवल्याने, त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीस अडचण दिसत नाही. काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांचा बालेकिल्ला त्यांनी उद्‌ध्वस्त केलाय. मागील निवडणुकीत पराभवाच्या भीतीने चतुर्वेदी दक्षिणेकडे गेले. त्यामुळे युवा नेते ॲड. अभिजित वंजारी यांना उमेदवारी मिळू शकली. पराभवानंतरही ते सातत्याने आपल्या मतदारांच्या संपर्कात आहेत. लोकसभेतही ते दिसून आले. येथून उमाकांत अग्निहोत्री आणि अतुल लोंढे हेसुद्धा दावेदारी करीत आहेत. दुसरीकडे चतुर्वेदींनी पराभवानंतर मतदारसंघ सोडून दिला. पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांना निलंबितही करण्यात आले. त्यामुळे दक्षिणेत नव्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते विशाल मुत्तेमवार यांनी आधीच येथे आपला दावा केलेला आहे. दुसरीकडे पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर लढणार, असा चंग उद्योजक प्रमोद मानमोडे यांनी बांधला आहे. ते सध्या काँग्रेसमध्ये नाहीत. मात्र, पटोले यांच्यासाठी त्यांनी मेळावा घेतला, रसदही पुरवली. अनेक वर्षांपासून उमेदवारीसाठी झटणाऱ्या गिरीश पांडव यांनाही पटोले यांनी कामाला लावले, तर प्रा. बबनराव तायवाडे यांना दक्षिण खुणावत आहे. ते प्रदेशाध्यक्षांच्या थेट संपर्कात आहेत. येथील भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर पक्षाचेच कार्यकर्ते नाराज आहेत.

प्रचारात गडकरी यांच्याही ही बाब निदर्शनास आली. मताधिक्‍यांचे गणित बिघडू नये, याकरिता त्यांनी माजी आमदार मोहन मते यांच्यावर धुरा सोपवली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघाचे पालकत्व महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते, तसेच लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्याकडे सोपवले आहे.

मुख्यमंत्री मुंबईतून लढण्याची शक्‍यता असल्याने, त्यांनी आपली तयारी करून ठेवली आहे. प्रफुल्ल गुडधे यांच्याशिवाय काँग्रेसकडे येथे दुसरा लोकप्रिय उमेदवार नाही. पक्षांतर्गत भांडणांमुळे ते लोकसभेत पूर्ण ताकदीने उतरल्याचे दिसले नाही. 

पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा दावा आहे. मोदी लाटेत आपला पराभव झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ‘अभी नहीं, तो कभी नहीं,’ अशी त्यांची स्थिती आहे. भाजपचे आमदार सुधाकर देशमुख आपण लढणार नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे भाजपतर्फे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या नावाचा येथून विचार होऊ शकतो. मुस्लिम आणि हलबाबहुल मध्य नागपूर मतदारसंघामध्ये दोनदा भाजपचे कमळ फुलवणाऱ्या विकास कुंभारे यांना नाराजीचा फटका बसू शकतो. येथून माजी महापौर प्रवीण दटके उत्सुक आहेत. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम किंवा हलबा कार्ड वापरू शकते. माजी मंत्री अनीस अहमद यांचे तळ्यातमळ्यात सुरू असल्याने, त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उत्तर नागपूर मतदारसंघामध्ये डॉ. मिलिंद माने यांनी भाजपला खाते उघडून दिले. मात्र, यात ‘बसप’मुळे झालेल्या मतविभाजनाचा मोठा वाटा आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांचा येथे पहिला दावा राहणार आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांना प्रचंड विरोध आहे. येथून नगरसेवक मनोज सांगोळे किंवा विवेक निकोसे यांचे नाव रेटले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Vidhansabha Preparation Interested Candidate Politics