Loksabha 2019 : गडकरी म्हणतात, अब की बार ईझी है यार...

Loksabha 2019 : गडकरी म्हणतात, अब की बार ईझी है यार...

नागपूर - पाच वर्षांच्या कार्यकाळात शहरात सुमारे 70 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत आपल्यासाठी यंदाची निवडणूक सोपी असल्याचा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तसेच भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीत पावणे तीन लाखांचे मताधिक्‍य मिळाले होते. यंदा यात एक ते सव्वा लाख मतांची वाढ होईल, असाही दावा त्यांनी केला. 

गडकरी यांनी बुधवारी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामेच घेऊन आपण जनतेसमोर जाणार असल्याचे सांगितले. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली सर्वच आश्‍वासने पूर्ण केली आहेत. त्यामुळे यावेळी जाहीरनामा करताना पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. मी माझी ओळख कधीच लपविली नाही. आपली विचारसरणी घेऊनच लोकांसमोर गेलो. नागपूरच्या मतदाराला ते चांगले ठाऊक आहे. कोणाची जात किंवा धर्म पाहून संबंध जोपसले नाहीत किंवा कामे करताना भेदभावसुद्धा केला नाही. याच कारणामुळे लोकांनी आपणास आपलेसे केले. त्यामुळे निवडणुकीत कोण मते देतील किंवा विरोध करतील याची चिंता आपण करीत नाही. मी आहे तसाच जनतेसमोर जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टीका करणार नाही 
आपण काय केले हे जनतेला ठाऊक आहे. ते दिसतही आहे. विरोधकांना मी काहीच केले नाही असे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही आणि टीका करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचे नाही असे आपले धोरण आहे; मात्र परखड व स्पष्ट बोलण्याची आपल्याला वाईट खोड आहे. त्यामुळे अडचणी उद्‌भवल्या असल्या तरी प्रेमही मिळाले. 

राजकरण करिअर नाही 
राजकारण आपले "करिअर' नाही. राजकारणाच्या माध्यमातून जास्त चांगले समाजकारण करता येते, या मताचे आपण आहोत. सायकल रिक्षा ओढणाऱ्याकडे बघून वेदना होत असल्याने ई-रिक्षाची निर्मिती केली. मेळघाटच्या जंगलात जाऊन आदिवासींसाठी रस्त्यांची निर्मिती केली. पाच वर्षांतील ही कामे आपणास सर्वांत समाधान देणारी आहेत. 

प्रियांकांचे गंगाभ्रमण ही पावतीच 
प्रियांका गांधी यांनी गंगानदीतून बोटीने भ्रमण केले. त्या गंगेचे पाणीसुद्धा पिल्या. ही आम्ही केलेल्या गंगाशुद्धीकरणाच्या कामाची पावतीच आहे. याच कामामुळे त्या गंगानदीतून बोटीनेसुद्धा फिरू शकल्या, असे गडकरी यांनी सांगितले. 

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com