युतीमुळे शिवसेनेला बळ

Ramtek
Ramtek

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी रामटेकचे प्रतिनिधित्व केलंय. येथील मतदारांनी बड्या बड्या नेत्यांना पराभवाचा धक्काही दिलाय. त्यामुळे येथे निकालापर्यंत कायम अनिश्‍चितता असते. युती कायम झाल्यामुळे विद्ममान खासदार कृपाल तुमाने यांना बळ मिळाले आहे. मुकुल वासनिकांनी रामटेकवर दावा केलाय. त्यामुळे ही लढाई तुल्यबळ ठरू शकते. 

नागपूर शहराच्या सभोवताल विखुरलेला रामटेक दहा वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या रामटेकमध्ये सुनील केदार सोडल्यास पाचही आमदार भाजपचे आहेत. युती असल्याने शिवसेनेने रामटेकमध्ये चांगलेच पाय पसरलेत. युतीत रामटेक, काटोल आणि हिंगणा असे तीन मतदारसंघ त्यांच्या वाट्याला होते. लोकसभेत आजवर शिवसेनेला त्याचा चांगलाच फायदा झाला. 

सुबोध मोहिते, प्रकाश जाधव आणि कृपाल तुमाने असे शिवसेनेचे तीन खासदार येथून निवडून आले. विधानसभेवेळी युती तुटल्यानंतर शिवसेनेचा एकही आमदार येथे टिकू शकला नाही. त्यामुळे लोकसभा कायम राखायची असेल, तर शिवसेनेला युतीशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे मोदी लाट ओसरल्याचा फायदा घेण्यासाठी वासनिकांनी पुन्हा आपल्या फेऱ्या वाढवल्यात. काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनीही येथे दावा केलाय. ‘एमपीएससी’ समितीचे सदस्यत्व आणि भाजप सोडून अलीकडेच काँग्रेसमध्ये आलेले गजानन जांभूळकर यांनीही फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसला रामटेक काबीज करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. 

मोदींची लोकप्रियता ओसरल्याचा फायदा मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसची आहे. याशिवाय साडेचार वर्षांचा तुमाने यांचा कार्यकाळ चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी केंद्राने फारसे काही दिले नसल्याने ग्रामीण भागात भाजपविरोधात असंतोष खदखदत आहे. दांडगा जनसंपर्क, सहज उपलब्ध होणारा नेता या तुमानेंच्या जमेच्या बाजू आहेत. वासनिक यांचा दावा प्रबळ असला तरीदेखील जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर पकड असलेल्या सुनील केदार यांनी नितीन राऊत यांची बाजू उचलून धरली आहे.

२०१४ चे मतविभाजन 
    कृपाल तुमाने (शिवसेना) - ५,१९,८९२ (विजयी) 
    मुकुल वासनिक (काँग्रेस) - ३,४४,१०१ 
    किरण प्रेमकुमार रोडगे (बसप) - ९५,०५१ 
    प्रताप गोस्वामी (आप) - २५,८८९ 

मतदारसंघातील प्रश्‍न 
    नागपूर जिल्ह्यात संत्राप्रक्रिया उद्योग रखडला
    मिहान प्रकल्पात रोजगाराचे आश्‍वासन 
    पेंच प्रकल्पाचे शेतीसाठी आरक्षित पाणी शेतकऱ्यांना देणे
    नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे पाच वर्षांत सुरू झालेली नाही 
    नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून काटोल जिल्हा होण्यासाठीचे प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com