कोकणातील २००९ ची लक्षवेधी लोकसभा निवडणूक

कोकणातील २००९ ची लक्षवेधी लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरची ही पहिलीच लढत होती.

राजापूरऐवजी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघ तयार होऊन तो चिपळूणपर्यंत विस्तारला होता. पुढे रायगड मतदारसंघ लागला होता. यापूर्वी कोकणातील शिवसेनेचे मोठे नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन तेथे आपले भक्कम स्थान निर्माण केले होते. शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभूंनी मधल्या काळात मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. शिवसेनेने रत्नागिरी- सिंधुदुर्गातून प्रभूंनाच उमेदवारी दिली. काँग्रेसतर्फे नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र डॉ. नीलेश राणे रिंगणात होते.

शिवसेनेत असताना प्रभू राणेंच्या पाठबळावर निवडून यायचे. या वेळची लढत वेगळी होती. याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राणेंनी पूर्ण ताकद लावली. शिवसेनेने मुंबईतूनही संघटनात्मक बळ पुरविले; पण त्यात शेवटी शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला. 

या मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश प्रभू (३०७१६५ मते), तिसऱ्या आघाडीचे सुरेंद्र बोरकर (१८८५८), बसपचे डॉ. जयेंद्र परूळेकर (१५४६९), क्रांतीकारी जयहिंदू सेनेचे अजय जाधव (७४०५), राष्ट्रीय समाज पक्षाचे राजेश सुर्वे (२३५८), हिंदू महासभेचे विलास खानविलकर (२४४८), भारिप आंबेडकर गटाचे सिराज ए कौचाली (६५८७), अपक्ष अबकर महंमद खलपे (५४१६) यांचा डॉ. नीलेश राणे यांनी (३५३९१५) पराभव केला.

सलग चार निवडणुका जिंकून रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गीते यांनी रायगड मतदारसंघ निवडला. पूर्वी रत्नागिरी मतदार संघ महाडपर्यंत होता. नव्या रचनेत तो श्रीवर्धन -पेणपर्यंत पोहोचला होता. बराच भाग नवा होता. असे असूनही गीतेंनी मोठा विजय मिळविला. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरीही त्यांना काही प्रमाणात फायदेशीर ठरली. यात काँग्रेस आघाडीचे बॅ. ए. आर. अंतुले (२६७०२५), काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रविण ठाकूर (३९१५९), अपक्ष सुनिल नाईक (२२२००), राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ पाटील (३८२६), बसपचे किरण मोहिते (१३०५३), डॉ. सिद्धार्थ पाटील (८५५९) यांचा अनंत गीते यांनी ४,१३,५६४ मते मिळवत दारूण पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com