Loksabha 2019 : उत्तर प्रदेशात भाजपचा अदलाबदलीचा खेळ

Loksabha 2019 : उत्तर प्रदेशात भाजपचा अदलाबदलीचा खेळ

नवी दिल्ली : लोकसभेतील विजयाची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तब्बल 29 जागांवरील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी घोषित केले. डॉ. मुरलीमनोहर जोशींचे तिकीट कापल्यावर कानपूरमधून स्थानिक नेते सत्यदेव पचौरी यांना तिकीट देण्यात आले आहे. मेनका व वरुण गांधी या अस्वस्थ माय-लेकांच्या पिलीभीत व सुलतानपूर या जागांची अदलाबदली करण्यात आली असून, आज भाजपवासी झालेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून आझम खान यांच्यासमोर उभे करण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेशात 11 एप्रिल ते 19 मे या सातही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील 80 पैकी 51 उमेदवार येथे भाजपने जाहीर केले आहेत. मेनका गांधी यांना वरुण यांच्या सुलतानपूरमधून व वरुण यांना पिलीभीतमधून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले आहे. प्रियांका गांधी-वद्रा यांचे लाडके चुलत भाऊ असलेले वरुण हे भाजपमध्ये फारच अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांना 2019 मध्ये थोपविण्यात मेनका व भाजप नेतृत्वाला तूर्त यश आले आहे.

सप-बसप महाआघाडी व कॉंग्रेस यांच्या राज्याच्या चारही विभागांतील आव्हानांचा व जातीय समीकरणांचा काळजीपूर्वक अभ्यास करून व प्रत्यक्ष नरेंद्र मोदींचा करिष्मा लक्षात घेऊनच सीईसीने यूपीची यादी तयार केल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. या राज्यात सत्तारूढ पक्षाने आपल्या अनेक खासदारांवर भरोसा ठेवल्याचेही दुसऱ्या यादीवरून तरी दिसते. केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा गाझीपूरमधून तर रमाशंकर कठेरिया यांना आग्र्यातून इटावात हलविण्यात आले आहे. राज्यातील मंत्री रीटा बहुगुणा जोशी यांना अलाहाबाद (प्रयागराज) येथून उमेदवारी देण्यात आली आहे. 

सुप्रियो पुन्हा रिंगणात 

दुसरीकडे भाजपला मोठी आशा असलेल्या पश्‍चिम बंगालमधील 10 जागाही आज जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (मिदनापूर), मंत्री बाबूल सुप्रियो (असनसोल), हुमायूँ कबीर (मुर्शिदाबाद), नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस (दक्षिण कोलकता), शांतनू ठाकूर (बानगांग), मुकुट मणी (राणाघाट -आरक्षित), देवदत्त सामंत (कांठी), डॉ. सुभाष सरकार (बांकुरा) आदी बड्या नावांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com