Loksabha 2019 : पवारांना बारामतीतच रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

भाजप-शिवसेना युतीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

बारामती : लोकसभा निवडणुकीचं रण आता चांगलेच तापले आहे आणि प्रतिपक्षातील तालेवार नेत्यांना एकाच जागी गुंतवून ठेवण्याची रणनीतीही अंमलात आणली जात आहे. भाजप-शिवसेना युतीने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना बारामतीतून बाहेर पडण्यास फारसा वाव मिळू नये, अशी व्यूहरचना भाजपने आखली आहे. याचे प्रतीक म्हणून कांचन कूल यांच्या उमेदवारीचा दाखला दिला जात आहे.

यंदा भाजपने बारामतीतून कांचन कूल यांना उमेदवारी दिली आहे. पण गेल्या निवडणुकीप्रमाणे बारामतीतील उमेदवार वेगळ्या चिन्हावर लढणार नाही. त्यासाठी कूल यांना 'कमळ' याच चिन्हावर उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या शहरी भागातील मतदाराचा गोंधळ होऊन ती मते फुटू नयेत, यासाठी ही काळजी घेतल्याचे दिसत आहे. शिवाय, बारामतीत विजय खेचून आणण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या एका वजनदार नेत्याने स्वतःहून स्वीकारली असल्याचेही समजते.

याशिवाय, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शनिवारी बारामती तालुक्यातील जिरायत भागातील सुपे या गावात कूल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती शहरामध्ये रासपच्या कार्यकर्त्यांसमवेत विचारविनिमय करून कूल यांना विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. काल सदाभाऊ खोत यांनीही बारामती तालुक्यात दोन सभा घेतल्या.

त्यामुळे पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त वेळ थांबवून ठेवत राज्याच्या इतर भागातील प्रचाराची धग कमी करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: BJP making Political Strategy to Control Sharad Pawar in Baramati