Loksabha 2019 : भाजप म्हणजे 'वन मॅन शो, टू मॅन आर्मी' : शुत्रघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

- मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री मुक्तपणे कामही करू शकत नाहीत. 

- नरेंद्र मोदींची आईही नोटाबंदीच्या काळात रांगेत उभी होती.

नवी दिल्ली : बिहारमधील भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज (शनिवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप नेतृत्त्वावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप म्हणजे 'वन मॅन शो', 'टू मॅन आर्मी' आहे. यामध्ये जे काही होतं ते सर्व पंतप्रधान कार्यालयातून घडते. त्यांचे मंत्री मुक्तपणे कामही करू शकत नाहीत. 

शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर टीका केली जात होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट केले होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, पक्षप्रवेश करताच त्यांनी भाजप नेतृत्त्वावर टीकास्त्र सोडले. यामध्ये त्यांनी सांगितले, की 'वन मॅन शो', 'टू मॅन आर्मी'मध्ये जे काही होतं ते सर्व पंतप्रधान कार्यालयातून घडते. त्यांचे मंत्री मुक्तपणे कामही करू शकत नाही. आता आपण पाहत आहोत, की लोकशाही कशी हुकूमशाहीमध्ये रुपांतरित झाली आहे. 

तसेच त्यांनी मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरही सडकून टीका केली. नोटाबंदी हा देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. हा निर्णय कोणताही विचार करून घेण्यात आला नाही. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. खुद्द पंतप्रधान मोदींची आई रांगेत उभी होती, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP One Man Show Two Man Army says Shatrughan Sinha