Loksabha 2019 : पाकिस्तानचे पाणी बंद करू : गडकरी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जे बोलतो ते करतोच 
इतर नेत्यांप्रमाणे मी केवळ ठोकणारा नेता नाही. मी जे बोलतो ते मी करतोच. जर करायचे नसेल तर बोलतच नाही. जे करतो तेच मी तुम्हाला सांगतो असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. विकासाचा हा रथ पुढे चालविण्यासाठी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सोलापूर : भारत-पाकिस्तानमध्ये 1960 साली करार झाला आहे. त्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे. पण, हल्ली पाकिस्तान आतंकवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे भाईचारा, सौहार्दाचे वातावरण राहिले नाही. पाकिस्तानने आतंकवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे जाणाऱ्या तीनही नद्यांचे पाणी बंद करू. जेणेकरून पाकिस्तान तडफडून मरेल, असा इशारा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. 

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची आज सोलापुरात सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉ. महास्वामी उपस्थित होते. श्री. गडकरी म्हणाले, पाकिस्तान नेहमीच सीमेवर कुरापती करत असतो. त्याने 1960 साली केलेल्या कराराचा भंग होत आहे. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही तर आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करताना गडकरी म्हणाले, ते दोघेही संधिसाधू राजकारणी आहेत. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी गरिबी हटावची घोषणा दिली होती. आता त्यांचा पणतूही तीच घोषणा देत आहे. कॉंग्रेसने देशातील गरिबी दूर केली पण ती त्यांच्या चमच्यांची होती, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. 

मुंबई-दिल्ली अंतर 12 तासांत 
मुंबई ते दिल्ली हा रस्ता करण्यास सुरवात केली आहे. 12 पदरी असलेला हा रस्ता करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हे अंतर चारचाकीच्या माध्यमातून 12 तासात कापणे शक्‍य होणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले. देशात या पाच वर्षात जेवढी कामे झाली ती यापूर्वी का झाली नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोट्यवधी रुपये खर्चून बुद्ध सर्किट, राम-जानकी सर्किट पूर्ण करण्यात येणार आहे. 

शिंदे म्हातारपणी का उभे राहिले 
सोलापूरचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे माझे मित्र आहेत. पण, आता म्हातारपणी ते लोकसभा निवडणुकीसाठी का उभारले असा सवालही गडकरी यांनी उपस्थित केला. 

जे बोलतो ते करतोच 
इतर नेत्यांप्रमाणे मी केवळ ठोकणारा नेता नाही. मी जे बोलतो ते मी करतोच. जर करायचे नसेल तर बोलतच नाही. जे करतो तेच मी तुम्हाला सांगतो असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. विकासाचा हा रथ पुढे चालविण्यासाठी केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Minister Nitin Gadkari speaks in rally at Solapur