काँग्रेसमध्ये उत्साह नाही.. विश्वासही दिसत नाही! (श्रीमंत माने)

Rahul Gandhi Congress President
Rahul Gandhi Congress President

जनतेला सांगण्यासारखे खूप काही आहे, कृतीतून अनेकदा करून दाखविले आहे. तथापि, ते जनतेसमोर नेऊन आक्रमकपणे मांडणे आणि विरोधकांना नामोहरम करण्यात काँग्रेस मागे पडत आहे.

क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज बाद नसला, तरी पंचावर दबाव आणण्यासाठी जे अपील केले जाते; त्याची हेटाळणी "उत्साह में जादा, विश्‍वास में कम' अशी केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या सामन्याचा टॉस कोणत्याही क्षणी होईल. प्रतिस्पर्धी फलंदाज बाद करण्यासाठी अपिलावर अपिले होतील. भाजपमध्ये उत्साह अधिक आहेच. काँग्रेसमध्ये मात्र तसे नाही.

काश्‍मीरमधील पुलवामा येथे "सीआरपीएफ'च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला होईपर्यंत ही निवडणूक राफेल, अंबानी, बेरोजगार, शेतकरी अशा मुद्‌द्‌यांवर होईल, असे वाटत होते. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुका जिंकल्याने वातावरण काँग्रेसला पोषक होते. पण, आता चित्र काहीसे बदलले आहे. पुलवामाची घटना, हवाई दलाकडून पाकिस्तानात घुसून बालाकोटमध्ये झालेली कारवाई, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकच्या ताब्यात आणि सुटका या घटनांनंतर काँग्रेस पक्ष भांबावल्याचे, प्रचाराच्या धुमाळीत बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. जुने मुद्दे जोरात वाजवायचे, की नव्या मुद्‌द्‌यांना हात घालून भाजपने तयार केलेल्या रणांगणावर सत्ताधाऱ्यांशी दोन हात करायचे, अशा द्विधा मनःस्थितीत पक्ष आहे. एखाद्या विधानावरून टीका होईल, या भीतीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सगळेच वरिष्ठ नेते ग्रासलेले दिसताहेत. 

याउलट, माध्यमांनी युद्धज्वर निर्माण केल्यानंतर वातावरणाचा लाभ घेण्यासाठी भाजप आक्रमकतेने मैदानात उतरलाय. भलेबुरे नंतर पाहू, निवडणूक जिंकणे महत्त्वाचे, अशा पवित्र्यात भाजप आहे. काँग्रेसने सरकारला प्रश्‍न विचारला, की तो देशावर आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रतिहल्ला ठरतो. दहशतवाद्यांच्या विरोधात आणि देशाच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने काहीही केलेले नाही, असा प्रचार जोरात सुरू आहे.

परिणामी, संसदेवरील अतिरेकी हल्ला किंवा मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी कृत्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात केलेली कारवाई, अफजल गुरू आणि अजमल कसाबला देण्यात आलेली फाशी, अशी अलिकडची कामेही काँग्रेसकडून सुसंगतपणे जनतेसमोर ठेवली जात नाहीत. वस्तुस्थिती नीटपणे लोकांसमोर ठेवणारे नेते शांत आहेत. तशी प्रभावी यंत्रणा पक्षाकडे नाही. वारंवार बदलणाऱ्या जनमानसाचा अंदाज घेण्याची व्यवस्था पक्षात नाही. म्हणूनच, गोलंदाज जोशात असतील तर खेळपट्टीवर उभे राहण्याची, बचावाची वेळ काँग्रेसवर आली आहे. 

आत्मविश्‍वासाचा अभाव 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत तर काँग्रेसमधील आत्मविश्‍वासाचा अभाव स्पष्ट जाणवणारा आहे. राष्ट्रवादी अधिक संघटितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. दिशा स्पष्ट आहे. कारण, आपला मतदार कोण, पक्षाचा प्रभाव राज्यातील कोणत्या टापूत आहे, हे त्यांना नेमके माहिती आहे. त्यामुळेच सैन्यदलांच्या कामगिरीसह सगळ्या संवेदनशील मुद्‌द्‌यांवर थेट मोदी सरकारला जाब विचारताना राष्ट्रवादीचे नेते कचरत नाहीत. 

याउलट, काँग्रेसमध्ये तिकिटांचीच चर्चा अधिक आहे. तिकीट म्हणजे विजय, या इतिहासातील मानसिकतेतून पक्षातील नेते बाहेर पडलेले नाहीत. वंचित बहुजन आघाडीसोबत समझोत्यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकरांपुढे पक्षाने अक्षरश: लोटांगण घातले आहे.

मुंबईबाहेर काँग्रेसचा प्रभाव म्हणाल, तर विदर्भाचा अपवाद सोडला तर जागोजागी ठिपके आहेत. उत्तर महाराष्ट्रात धुळे, पश्‍चिम महाराष्ट्रात नगर, दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर-लातूर; तर मराठवाड्यात नांदेड अशा मोजक्‍या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे. एखाद्या प्रदेशात पक्षाच्या बाजूने वातावरण तयार होण्याची शक्‍यता आहे ती विदर्भात. तिथली लढाई मुख्यत्वे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच आहे आणि नाना पटोले, डॉ. आशिष देशमुख हे नेते भाजपकडून काँग्रेसमध्ये आल्याचा फायदा होऊ शकतो. परंतु, पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत विदर्भाला अजिबात स्थान नाही. प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते वगैरे सगळी पदे विदर्भाबाहेर आणि यशाची अपेक्षा मात्र तिकडून, अशी विचित्र स्थिती आहे. 

बखर काँग्रेसची 

  • देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष (स्थापना : 28 डिसेंबर 1885) 
  • सर्वांत चांगली कामगिरी - आठवी लोकसभा 1984 (542 पैकी 415 जागा, 49.01 टक्‍के मते), दुसरी लोकसभा 1957 (494 पैकी 371 जागा, 47.78 टक्‍के मते) 
  • सर्वांत खराब कामगिरी - सोळावी लोकसभा 2014 (543 पैकी 44 जागा, 19.3 टक्‍के मते) 
  • देशाला दिलेले पूर्णवेळ पंतप्रधान - सहा - पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग 
  • सत्ता असलेली राज्ये - पाच - पुदुचेरी, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड (घटक पक्षांसह सत्ता - कर्नाटक)
  • आव्हाने : 1. संयुक्‍त पुरोगामी आघाडीची फेरबांधणी, 2. प्रादेशिक पक्षांशी यशस्वी वाटाघाटी, 3. नरेंद्र मोदींशी स्पर्धा करणारा राष्ट्रीय नेतृत्वाचा चेहरा देणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com