‘गाय बी गेली आणि वासरूबी गेलं...’

‘गाय बी गेली आणि वासरूबी गेलं...’

१९७७ ची लोकसभा निवडणूक ही आणीबाणीनंतरची निवडणूक, म्हणजे विरोधी पक्षांच्या दृष्टीने पुन्हा एका स्वातंत्र्यानंतरची निवडणूक. देशभर एक वेगळे वातावरण. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नव्हता. काँग्रेसचे शंकरराव माने विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई अशी लढत होती. मतदान झाले. मतमोजणी सुरू झाली आणि निकालाचा कौल एकदा मानेंच्या बाजूने, पुन्हा दाजिबांच्या बाजूने असा झुलत राहिला. रात्रभर मतमोजणी सुरू राहिली.

फक्त १६५ मतांनी दाजिबा देसाई विजयी होणार असे चित्र निर्माण झाले. रात्रभर निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी जल्लोष केला; पण पुन्हा मतमोजणी सुरू झाली. पुन्हा अनेकांचा जीव टांगणीला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निकाल जाहीर झाला. शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई यांनी काँग्रेसचे शंकरराव माने यांचा १६५ मतांनी पराभव केला. 

दाजिबा देसाई यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील वरुणतीर्थ वेस गांधी मैदानात पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत यांची सभा झाली होती. त्यांची एवढी विराट सभा कोल्हापूरकरांनी प्रथमच पाहिली होती. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागताच कोल्हापुरात गुलालाची उधळण सुरू झाली. हलगी, कैताळ, घुमक्‍याचा दणदणाट सुरू झाला. बिंदू चौकातून मिरवणूक सुरू झाली; पण गर्दी एवढी की मिरवणुकीला दिशाच राहिली नाही.

मिरवणूक कशीबशी भाऊसिंगजी रोडवर आली आणि ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील गुजरीच्या कोपऱ्यावर एका कट्ट्यावर चढून उभे राहिले. तेथेच विजयी सभेला सुरवात झाली. एन. डी. पाटील यांनी पहिलंच वाक्‍य उच्चारलं, ‘गाय बी गेली आणि वासरूबी गेलं.’ शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण त्या निवडणुकीत इंदिरा गांधी व संजय गांधी हे दोघेही पराभूत झाले होते.

या निवडणुकीच्या निमित्ताने दाजिबा देसाई यांच्यासारख्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला खासदारपद मिळाले. ते बेळगावजवळच्या उचगावचे. ते इनामदार घराण्यातले असूनही त्यांनी कसेल त्याची जमीन या न्यायाने इनामदारी सोडली आणि लाल झेंडा खांद्यावर घेतला. सीमाभागात होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी सतत आवाज उठवला. अखेरपर्यंत दाजिबा देसाई चळवळीत अग्रभागी राहिले. १९ मार्च १९८५ मध्ये अलिबाग येथे त्यांचे अचानक निधन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com