Loksabha 2019 : मोदींमुळे खुंटला सोलापूरचा विकास : सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- अॅड. आंबेडकरांकडून बाबासाहेबांच्या विचारसणीचा खून

- भाजपकडे अजेंडा नाही

सोलापूर : देशातील विविध शहरांना अनेक योजना मंजूर करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरला मात्र कायम वंचित ठेवले. त्यांच्यामुळे सोलापूरचा विकास खुंटला,
अशी टीका माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. तसेच ही निवडणूक माझी शेवटचीच निवडणूक असणार आहे, यापुढे आमदार-खासदार
किंवा इतर कोणत्याही निवडणुका लढविणार नसल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सोलापूर काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, भाजपचे तत्कालीन कार्यकर्ते असलेले नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. गृहमंत्रालयांतर्गत 13 लाख निमलष्करी दल असताना त्यांच्यासाठी सोलापुरातून कापड का खरेदी केलं नाही, असा प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारला होता. मात्र, मी आता त्यांना विचारत आहे, गेल्या पाच वर्षांत सोलापुरातून एक मीटर तरी कापड खरेदी केला का याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. सोलापूरकरांबाबत त्यांना प्रेम होते तर येथील वस्त्रोद्योगाला चालना का मिळवून दिली नाही. एकीकडे राज्यातील इतर शहरांना सातत्याने काही ना काही देत असताना मोदींनी सोलापूरला मात्र नेहमीच वंचित ठेवले. सोलापुरात चार वेळेस भाजपचे खासदार होते. त्यांच्या कालावधीत
एकही नवीन प्रोजक्ट त्यांनी आणलेले नाही. जे प्रकल्प काँग्रेसच्या कालावधीत सुरु झाले होते, तेच पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांनी केले.

भाजपकडे अजेंडा नाही

भाजपकडे कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही. त्यामुळे सध्या भाजपचे नेते हवेत बोलत आहेत. नितीन गडकरी यापूर्वी रस्त्यांबाबत बोलायचे, मात्र आता ते हवेतच बोलू
लागले आहेत. काँग्रेसने काही केले नाही, असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र, काँग्रेसनेच सर्वकाही केले, असेही त्यांनी सांगितले.

अॅड. आंबेडकरांकडून बाबासाहेबांच्या विचारसणीचा खून

धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराजांना राजकारणात आणून भाजपवाल्यांनी त्यांचा बळी दिला आहे. तर एमआयएमशी संगत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीचा खून केला आहे.

एक तरी टिकाऊ प्रोजेक्ट आणा

काँग्रेसने आणलेले प्रोजेक्ट टाकाऊ आहेत, अशी टीका केली जाते. आमचे प्रोेजेक्ट टाकाऊ आहेत तर भाजपवाल्यांनी एक तरी टिकाऊ प्रोजेक्ट आणावेत, असे आव्हानही शिंदे यांनी केले. 

Web Title: The development of Solapur is reduced due to Modi says Sushilkumar Shinde