Loksabha 2019 : बारामतीकडे वाकडया नजरेने पाहू नका - सुप्रिया सुळे

supriya-sule.
supriya-sule.

केडगाव - बारामती आमची आहे. येथील सर्व लोक आमचे आहेत. बारामतीकडे वाकडया नजरेने पाहू सुद्धा नका. भाजपवाल्यांना जो काही गोंधळ घालायचा तो त्यांनी नागपूर आणि गोध्रामध्ये घालावा. असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार सुळे यांचा यवत व केडगाव येथे पदयात्रा व सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, जिल्हा परिषदेच्या सभापती राणी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, आनंद थोरात, वैशाली नागवडे, गणेश कदम, दौलत ठोंबरे, सुभाष यादव, रामदास दोरगे, विकास खळदकर, भाऊसाहेब दोरगे आदी उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, निवडणुकीत मतदारांनी नेहमी मेरीटवर मतदान करावे. नातीगोती नंतर पहावीत. माझे मतदार संघातील व संसदेतील काम पाहून मतदान करावे. आदर्श संसदपटू पुरस्कार मी विरोधात असताना मिळाला. विरोध फक्त निवडणुकीपुरता असावा. पण सरकारने चुकीचे धोरण आखले की त्याला विरोध करणार. मतदार संघातील जनतेला कधी विसरायचे नाही ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. गेल्या 50 वर्षात राज्याचे राजकारण आमच्या कुटुंबाभोवती फिरत आहे. वयोश्री व कुपोषणात बारामती लोकसभा मतदार संघाचे कौतुकास्पद काम झाले आहे.  

यावेळी थोरात म्हणाले, बारामती लोकसभा मतदार संघात 25 हजार सायकलींचे वाटप झाले आहे. भीमा पाटस कारखान्याने 2601 रूपये जाहिर करून 1964 रूपये दर दिला आहे. जिल्हाधिकारी साखर जप्त करून शेतक-यांना पैसे देणार आहे. भीम पाटसचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांनी कारखान्याला दिलेल्या 36 कोटी रूपयांचे काय केले याचा हिशेब द्यावा. सामान्य माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे राहिल. सुळे यांनी अजिबात चिंता करू नये. मागे झालेली चूक यावेळी दुरूस्त करू या. दिलीप हंडाळ यांनी सूत्रसंचालन केले.

मतदार धडा शिकवतील - पवार
शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी पिचला आहे. कर्जमाफी फसली आहे. धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. बेरोजगारांना नोक-या नाहीत. भीमा पाटस कारखान्याचा सभासद व कामगार समाधानी नाही. या सर्वांचा परिणाम मतांमध्ये दिसून आल्याशिवाय राहणार नाही. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com