Loksabha 2019 : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सुनिल तटकरेंना पराभूत करा : रविंद्र चव्हाण

अमित गवळे
रविवार, 7 एप्रिल 2019

पार्थचे 'पार्सल' पुन्हा बारामतीला पाठवू

मावळ मतदारसंघात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा निवडणूक रिंगणात असून, येत्या 29 तारखेला पार्थचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवून देऊ, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

पाली (जिल्हा  रायगड) : रायगड लोकसभा निवडणुकीची लढाई भ्रष्टाचारविरुध्द सदाचार अशी आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराने बरबटलेले सुनिल तटकरे तर दुसर्‍या बाजूला कर्तृत्ववान, निष्कलंक  व सदाचारी लोकप्रतिनिधी अनंत गिते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनंत गिते यांच्या प्रचारार्थ येथील भक्तनिवास क्र. 2 बुथ अध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख तसेच भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत संवाद साधण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.

देशद्रोह्यांवरील खटले रोखण्यासाठी पुढाकार घेणार्‍या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी टीका केली. देशाकडे वाकड्या नजरेने बघणार्‍या चीन व पाकिस्तानसारख्या राष्ट्राला त्यांची जागा दाखविणाऱ्या मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाची देशाला गरज आहे. देशद्रोह्यांसाठी काम करणार्‍यां काँग्रेसची देशाला मुळीच गरज नाही. शिवसेना व भाजपमध्ये साडेचार वर्षे कटूता होती. मात्र, देशाच्या भवितव्यासाठी युतीची गरज ओळखून राष्ट्रीय नेतृत्वांनी युतीचा जो महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी देखील स्वागत केले, असे चव्हाण म्हणाले.

पेण सुधागड मतदारसंघात शेकाप व राष्ट्रवादीला औषधालाही मतदान होणार नाही, असे किशोर जैन म्हणाले. राजेंद्र राऊत यांनी युतीचे उमेदवार अनंत गिते यांना सुधागड तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी भाजप रायगड  आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष किशोर जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतिष धारप, भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस विष्णु पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, भा.ज.पा जिल्हा चिटणिस राजेश मपारा, कोबनाक, भा.ज.पा युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राउत, श्रीवर्धन विधानसभा मतदारस संघ अध्यक्ष संजय कोणकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, बंडू खंडागळे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, चंद्रकांत घोसाळकर, निखिल शहा, आनंद लाड आदिंसह सेना भा.ज.पा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. 

पार्थचे 'पार्सल' पुन्हा बारामतीला पाठवू

मावळ मतदारसंघात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा निवडणूक रिंगणात असून, येत्या 29 तारखेला पार्थचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवून देऊ, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांच्या रुपाने लढतीत असलेला भ्रष्टाचाराचा अजगर निपचीत पाडण्याचे काम जनतेने केले. आता पुन्हा सर्वांच्या ताकतीने तटकरे यांना पराभूत करण्याची कामगिरी करु या. आजवर तत्वाच्या गोष्टी करणार्‍या शेकापने कितीही लांड्यालबाड्या केल्या तरी जनता शेकापला जवळ करणार नाही, असे ठाकूर म्हणाले.

Web Title: Do not vote to Sunil Tatkare says Ravindra Chavan