Loksabha 2019 : विरोधकांकडे दुर्लक्ष करत भाजपची डॉ. भामरेंनाच उमेदवारी

Subhash Bhamre
Subhash Bhamre

धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या टीका-टिप्पणी, आरोपांकडे सपशेल दुर्लक्ष करत भाजपने डॉ. भामरे यांच्या गेल्या साडेचार वर्षांतील कार्यावर विश्‍वास व्यक्त केल्याचे मानले जाते. या निर्णयामुळे विरोधकांकडून डॉ. भामरे यांच्या उमेदवारीविषयी घडविल्या जाणाऱ्या उलटसुलट चर्चांनाही पूर्णविराम मिळाला. 

डॉ. भामरे यांनी 1995 मध्ये राजकारणात पदार्पण केले. कॉंग्रेस, शिवसेनेतील प्रवासानंतर त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी लाटेसह डॉक्‍टर असल्याने जनसंपर्काचा लाभ, उच्च विद्याविभूषित, विनम्र, संयमी, हसतमुख व्यक्तिमत्त्वाची ओळख, तसेच मतदारसंघातील नात्यागोत्यांमुळे डॉ. भामरे विजयी झाले. त्यांनी एक लाख 30 हजारांच्या मताधिक्‍याने विजय मिळवला. यात त्यांनी कॉंग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल यांचा पराभव केला होता. कालांतराने भाजपने त्यांना संरक्षण राज्यमंत्रिपद बहाल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशातील अनेक महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये डॉ. भामरे यांना प्रतिनिधित्वाची संधीही दिली. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या जवान चंदू चव्हाणला मायदेशी सुखरूप आणणे आणि पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या "एअर स्ट्राईक'संबंधी घडामोडींमध्ये डॉ. भामरे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. 

विकास कामांचे भांडवल 
मंत्रिपदाच्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न डॉ. भामरे यांनी केला. त्यांनी जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि 35 वर्षांपासून रखडलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग, तापी नदीतील पाणी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून धुळे, शिंदखेडा तालुक्‍यांतील दोनशेवर गावांसाठी लाभदायक ठरणाऱ्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेचा प्रश्‍न मार्गी लावला. मतदारसंघात सिंचनासह कृषी, पाणी, पायाभूत सुविधांचा विकास यासह विविध विकासकामे त्यांनी मार्गी लावली. मतदारसंघात जनसंपर्क ठेवला. हजारो हातांना काम मिळण्यासाठी मालेगाव- धुळ्याच्या सीमेवर एक प्रकल्पही मार्गी लावण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. अशा विकासकामांच्या भांडवलावरच ते कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न करतील. 

डॉ. भामरेंपुढील आव्हाने 
कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला धुळे मतदारसंघ दहा वर्षांपूर्वी भाजपने ताब्यात घेतला. होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी डॉ. भामरे यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विकासाच्या मुद्याबरोबरच जातीय समीकरणांच्या आधारे लढविल्या जाणाऱ्या या निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधक व नाराज झालेल्यांना जवळ करण्याचा प्रयत्न डॉ. भामरे यांना करावा लागेल. मतदारसंघात वर्चस्व तयार करत असताना डॉ. भामरे यांच्याविरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप आणि शिवसेनेतील नाराज गट, तसेच इतर सर्व विरोधक एकत्र आले आहेत. संरक्षण राज्यमंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाईल' निवडणूक होतानाच प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीने तरुण उमेदवार देऊन युतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ती कशी फोडली जाते आणि विरोधकांचे आव्हान डॉ. भामरे कसे मोडीत काढतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com