Loksabha 2019 : कन्हैया कुमार नसल्यामुळे गिरिराजांचा सुटकेचा निःश्‍वास 

Loksabha 2019 : कन्हैया कुमार नसल्यामुळे गिरिराजांचा सुटकेचा निःश्‍वास 

पाटणा : बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने (महागठबंधन) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती.

गिरिराज सिंह हे बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार असून, कन्हैया कुमार याच जिल्ह्यातील आहे. गिरिराज सिंह यांनी गेली लोकसभा निवडणूक नवादातून लढविली होती. यंदा त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. महाआघाडीत येण्यास भाकप उत्सुक होता; पण जागावाटपानंतर भाकपला महाआघाडीत स्थान नसल्याचे स्पष्ट झाले. छोट्या पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार जागा देण्याचे ठरले होते. पण महाआघाडीने भाकपला प्रवेशच दिला नाही आणि त्यामुळे कन्हैया कुमार हा महाआघाडीचा उमेदवार असण्याची शक्‍यताच संपुष्टात आली. आता पुढील धोरण ठरविण्यासाठी भाकपच्या कार्यकारिणीची उद्या (ता. 24) बैठक होणार आहे.

राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर चर्चा होऊनही भाकपला महाआघाडीत स्थान मिळाले नाही याचे वाईट वाटत असल्याचे भाकपचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी सांगितले. 
लालूप्रसाद यांचा मुलगा तेजस्वी याच्या कारकिर्दीचा विचार करून कन्हैया कुमारच्या नावावर फुली मारण्यात आल्याची चर्चा आहे. तेजस्वीऐवजी कन्हैया कुमारचे महत्त्व वाढेल, अशी भीती लालूप्रसाद यांना वाटते.

मुस्लिम मतांचे गणित हे दुसरे कारण आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या बेगुसरायमध्ये तनवीर हसन यांना राजदकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्याऐवजी कन्हैया कुमारला उमेदवारी दिल्यास मुस्लिम मते फिरण्याची भीती लालूप्रसाद यांना वाटते. गेल्या निवडणुकीत बेगुसरायमध्ये भाजपचे भोला सिंह यांनी हसन यांना 58 हजार मतांनी पराभूत केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com