Loksabha 2019 : लोकसभेसाठी अनंत गीते यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- अनंत गीते यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

- रायगड लोकसभा मतदार संघातून भरला अर्ज

महाड : रायगड जिल्ह्यात सर्व प्रमुख निवडणुकांमध्ये वापरला जाणारा नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करण्याचा फॉर्म्युला या निवडणुकीतही कायम असणार आहे. नामसाधर्म्याच्या या फॉर्म्युल्याने सुनील तटकरे नावाचा उमेदवार उभा राहिल्याने तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता अनंत गीते नावाचा उमेदवार विरोधकांनी उभा केला असून, त्यांनी आज अर्ज दाखल केला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुख्य उमेदवारांसमोर नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याचा प्रयोग रायगडच्या राजकारणात सातत्याने केला गेला. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते, काँग्रेस आघा़डीचे सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत शेकापकडून लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात पालकमंत्री सुनील तटकरे याच्या विरोधात सुनील श्याम तटकरे नावाचा उमेदवार रिंगणात उभा केला. त्याने तब्बल नऊ हजार 849 मते मिळविली. तर पालकमंत्री सुनील तटकरे 2 हजार 111 मतांनी पराभव पत्करावा लागला. तटकरे यांच्या पराभवाला हे एक कारण बनले.

आता हाच प्रयोग अनंत गीते यांच्याविरोधात वापरला जात असून, या लोकसभा निवडणुकीत अनंत पद्मा गीते या व्यक्तीने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रायगडची नामसाधर्म्यची परंपरा पुढे सुरु आहे. यापूर्वीच्या कुलाबा मतदार संघात शेकाप आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असे. बॅ. अंतुले आणि शेकापचे दत्ता पाटील यांच्यात राजकीय चुरस सातत्याने निर्माण होत असे. या नावाचे तसेच राम ठाकूर अशा नावाचे उमेदवार शोधून उभे केले जात.

मागील निवडणुकीत सुनील तटकरे या नावाचाच उमेदवार उभा केला गेला तर आता अनंत गीते नावाच्या अन्य उमेदवाराने अर्ज भरुन निवडणुकीत एकप्रकारे बॉम्बच टाकला आहे. आज रायगड मतदार संघात मिलिंद साळवी बसप यांचे दोन अर्ज व मधुकर खामकर अखिल भारत हिंदू महासभा व संदीप पार्टे बहुजन महापार्टी असे आत्तापर्यंत बारा अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: Independent Candidate Anant Geete Filed Nomination Form for Loksabha